पोलीस पथकावर हल्ला करणा-या आरोपीला सोडले; दारूबंदीसाठी महिलांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 11:10 AM2020-07-08T11:10:44+5:302020-07-08T11:11:32+5:30
राहुरी तालुक्यातील फॅक्टरी येथे दारू अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला केल्याची घटना ६ जुलै रोजी घडली आहे. मात्र पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. ताब्यात घेतलेला आरोपी काही वेळातच सोडून देण्यात आला. या प्रकरणी फॅक्टरी येथील महिलांनी पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्या दालनासमोर मंगळवारी (७ जुलै) ठिय्या आंदोलन करून पोलिसांना जाब विचारला.
राहुरी : तालुक्यातील फॅक्टरी येथे दारू अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला केल्याची घटना ६ जुलै रोजी घडली आहे. मात्र पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. ताब्यात घेतलेला आरोपी काही वेळातच सोडून देण्यात आला. या प्रकरणी फॅक्टरी येथील महिलांनी पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्या दालनासमोर मंगळवारी (७ जुलै) ठिय्या आंदोलन करून पोलिसांना जाब विचारला.
राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाच्या महिला जिल्हाध्यक्षा यमुना भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्षा रजनी कांबळे आणि आरपीआयच्या महिला जिल्हाध्यक्षा शालिनी पंडीत यांच्या नेतृत्वाखाली पंधरा दिवसांपूर्वी राहुरी फॅक्टरी परिसरातील प्रसादनगर येथे सुरू असलेले अवैध धंदे तत्काळ बंद करावेत, या मागणीसाठी फॅक्टरी परिसरातील महिलांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते. सदर अवैध धंदे तत्काळ बंद करून बीट पोलिसांची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती.
६ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास राहुरी पोलीस ठाण्यातील एक अधिकारी व काही पोलीस कर्मचारी फॅक्टरी येथील प्रसाद नगर येथे कारवाई करण्यासाठी गेले होते. मात्र यावेळी अवैध धंदे करणा-यांनी पोलीस पथकावर हल्ला केल्याची घटना घडली. यावेळी एका आरोपीला ताब्यात घेतले होते. मात्र काही वेळातच त्याला सोडून देण्यात आले. या घटनेबाबत राहुरी पोलिसांत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही.
सदर घटनेची चौकशी करून कारवाई करण्यात येईल. फॅक्टरी परिसरातील अवैध धंदे दोन दिवसांत पूर्णपणे बंद होतील. अशी ग्वाही पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी दिली. मात्र फॅक्टरी परिसरातील अवैध धंदे तत्काळ बंद झाले नाहीतर भविष्यात राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन, आरपीआय संघटना, इतर संघटनांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी महिलांनी दिला आहे.