मधुमेहींसाठी दिलासा! संजीवनी कारखाना बनवतोय शुगर फ्री साखर , गोड लागेल; परंतु ‘शुगर’ नाही वाढणार
By सचिन धर्मापुरीकर | Published: December 14, 2023 06:32 AM2023-12-14T06:32:49+5:302023-12-14T06:33:05+5:30
भारतात मधुमेहींची संख्या लक्षणीय असून ती वाढतेच आहे.
सचिन धर्मापुरीकर
कोपरगाव (जि. अहमदनगर) : भारतात मधुमेहींची संख्या लक्षणीय असून ती वाढतेच आहे. या परिस्थितीचा विचार करून अहमदनगर जिल्ह्यातील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने ‘शुगर फ्री’ साखर बनविण्याची तयारी सुरू केली आहे. कारखान्याच्याच प्रयोगशाळेत संशोधन सुरू असून, त्याला ५० टक्के यश मिळाले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास जागतिक साखर धंद्याला वेगळी दिशा मिळेल, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) केलेल्या संशोधनात देशात तब्बल १०.१ कोटी मधुमेही असल्याचे समोर आले आहे.
ही गंभीर बाब डोळ्यांसमोर ठेवून कारखान्याने जिभेला गोड तर लागेल; परंतु, रक्तातील साखर वाढणार नाही, अशी साखर बनविण्याचे ठरविले. साखरेमध्ये सल्फर आहे, त्याचे शरीरावर परिणाम होतात असे मानले जाते.
साखरेला पांढरा रंग येण्यासाठी सल्फरचा वापर केला जातो. आता सल्फरविरहित साखर बनविण्यास कोल्हे कारखान्याने सुरुवात केली आहे. रॉ शुगरमध्ये सल्फर नसते. ती पांढऱ्या रंगाची नसते. रॉ शुगर येथे तयार होते. आता सल्फरविरहित ‘शुगर फ्री‘ साखर बनणार आहे. कारखान्याच्याच प्रयोगशाळेत संशोधन सुरू आहे. तीन शास्त्रज्ञ यावर काम करीत आहेत. त्यांना ५० टक्के यश मिळालेले आहे.