धर्म ही अफूची गोळी आहे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 12:14 PM2018-09-09T12:14:00+5:302018-09-09T12:14:41+5:30
धर्म हा माणसाला मानसिक पातळीवर आधार देणारा घटक आहे. तो माणसाला अभासात्मक खोटे सुख देतो.
धर्म हा माणसाला मानसिक पातळीवर आधार देणारा घटक आहे. तो माणसाला अभासात्मक खोटे सुख देतो. या अभासाचा त्याग करायचा असेल तर धर्म तयार होण्यास जी परिस्थिती कारणीभूत ठरते, तिचा अंत करावा लागेल. म्हणजे माणसाचे दु:ख दूर करावे लागेल, असा मार्क्सच्या म्हणण्याचा सरळसरळ अर्थ होता़ पण सूज्ञ माणसांनीच मार्क्सच्या विचारांचा शेंडा व बुडूख खोडले आहे.
गेल्या काही वर्षात धार्मिक उन्मादाने हिंस्त्र स्वरुप धारण केले आहे. भारतात घडणाºया घटना या तूरळक व वरवरच्या असल्या तरी आपल्या शेजारी देशाचा अनुभव पाहता आपण धार्मिक उन्मादातून निर्माण होणाºया ज्वालामुखीच्या तोंडावर उभे आहोत याची जाणीव आपल्याला असणे गरजेचे आहे. सामान्य तरुणांकडे बॉम्बसारखी घातक हत्यारे सापडणे, बुद्धीवंतांच्या हत्या होणे, अनेक विचारवंताच्या हत्या करण्याचे नियोजन असणे, असे असूनही काही संघटनांनी त्याचे प्रसारमाध्यमातून समर्थन करताना ‘ते धर्मासाठी काम करणार योद्धे आहे. आम्ही त्यांना कायदेशीर मदत करणार’, असे ठासून सांगणे व तशी प्रत्यक्ष मदत करणे हे सर्व काही हादरवून सोडणारे आहे. समाज तर धार्मिक बाब असली की गप्प बसतो. परंतु अशा भयंकर घटना दडपण्यासाठी शासनानेही प्रयत्न करणे, हे त्यापेक्षाही दुर्दैवी आहे. भविष्यासाठी अत्यंत धोकादायक ठरणा-या या घटनांमुळे समाजमन अजिबात विचलित होत नाही तर याकडे अतिशय तटस्थपणे पाहत आहे. एकूणच ‘असे काही घडलेच नाही’ असा भाव जर समाजाचा, सामाजिक व राजकीय नेतृत्वाचा असेल व संपूर्ण जबाबदारी पोलीस यंत्रणांची आहे अशी जर भूमिका असेल तर आमच्या पुढे काय वाढून ठेवले आहे, हे येणारा काळच ठरवेल. हे काही तरुणच संमोहित होऊन असे कृत्य करत आहेत, असा आरोप होत असताना सर्व समाजही संमोहित झाल्यासारखा मतीगुंग झाल्याप्रमाणे या घटनांकडे पाहत आहे. हे अतिशय धोकादायक आहे. हे फक्त शासकीय काम नाही किंवा अशा घटना घडल्या म्हणून शासनाचे अपयश सुद्धा नाही. सत्तेतील शासनकर्ते फार तर पाच, दहा वर्षासाठी सत्तेत असतात त्यांच्या यशापयशावर संपूर्ण समाजव्यवस्था पणाला लावता येणार नाही. तर हे संपूर्ण समाजाचे अपयश आहे. हा शासकीय कामाचा भाग असला तरी हा शासन यंत्रणेविरुद्धचा संघर्ष नाही. ज्यांच्याकडे बॉम्ब सापडले, पिस्तुले सापडले त्यांना ती शासन व्यवस्थेविरुद्ध वापरायची नाहीत अथवा त्यांनी ती वापरली सुद्धा नाहीत. ज्या बुद्धीवंतांच्या हत्या झाल्या ते सत्ता किंवा शासन व्यवस्थेचे भाग नव्हते. मग त्यांच्या हत्या का झाल्या? यावरून एक स्पष्ट होते. हे तरुण किंवा त्यांच्या पाठीशी असणारी संघटना यांना सरकार उलथवून टाकायचे नाही किंवा संघर्ष ही करायचा नाही तर धार्मिक आधारावर त्यांच्या विचारधारेला विरोध करणा-यांविरुद्ध त्यांनी युद्ध पुकारले आहे. यात दोन बाजू आहेत. भारतीय समाजाला लागलेली धर्मवादाची, जातीवादाची, विषमतेची कीड दूर करण्यासाठी हे विचारवंत लोकशाही मार्गाने प्रयत्न करत आहेत. देशाच्या संविधानाच्या चौकटीत वैचारीक संघर्ष करून समाज धर्मांध शक्तीच्या प्रभावाखाली येणार नाही, यासाठी जागल्याची भूमिका निभावत आहेत. त्यांचा आवाज कायमचा बंद केला जात आहे. या बुद्धीजीवापैकी कोणीही कधीही देशाची राजसत्ता उलथवून लावण्याची भाषा केली नाही तर फक्त समाजपरिवर्तनाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांना हिंस्त्र मार्गाने संपवण्यात आले. लोकशाही मार्गाने वाद प्रतिवाद करण्याची क्षमता संपते, तेव्हा मनुष्य हिंसाचाराकडे वळतो. यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे, ज्या बुद्धीवंताच्या हत्या झाल्या ते कोणत्या धर्माचे ठेकेदार नव्हते, मग अशा घटना घडण्यापर्यंत समाज आला कसा? हा मोठा प्रश्न आहे. त्यांना धर्मद्रोही ठरवण्यात आले. ही धर्मद्रोही ठरवणारी व्यवस्था कोण आहे. तो धर्म नेमका कोणता आहे, की ज्याला या बुद्धीवाद्याचा धोका वाटला. गोळ्या घालणा-याला धर्म धोक्यात आल्याची जाणीव झाली़ जे मारले गेले ते हिंदूंच होते व जे मारेकरी आहेत तेही हिंदूच आहेत. ज्यांना हे खून पाडण्यासाठी वापरले गेले ते तर शूद्र ठरवलेल्या जात समुहातील आहेत. बळी जाणारे कोण व त्यांचा बळी घेऊन जिवंत राहून तरुंगात त्याची किंमत मोजणारे कोण? हे सर्वच चक्रावून सोडणारे आहे. एक मात्र निश्चित या सर्वांच्या पाठीशी धर्म नावाची गोष्ट आहे.
तो हिंदू की सनातन धर्म हा मुद्दा उपस्थित होतो़ जर तो हिंदू धर्म असेल तर आपल्याच धर्माच्या विचारवंताचे मुडदे का पाडले जात आहेत. त्यांनी कधीही धर्म नाकारला नाही. धर्माविरुद्ध बंडही पुकारले नाही. उलट धर्मांतर्गत असणारी विषमता जातीयतेची उतरंड संपवण्याचा प्रयत्न केला. जातीजातीत विभागला गेलेला समाज समतेच्या तत्त्वावर एकत्र येत असेल तर धर्म बळकटच होणार होता़ ते नवीन धर्माची स्थापना वगैरे करण्याचा दावाही करत नव्हते. फक्त धर्मांतर्गत जातीअंताची लढाई लढत होते. कर्मकांडाला विरोध करत होते. या प्रक्रिया हजारो वर्षे सुरूच आहेत. तेव्हाही पुष्यमित्र शुंगाने लाखो बौद्ध भिक्कूचे शिरकाण केले होते. आताही तेच सुरू असेल तर त्यातला फरक हा आहे की आता मारले जाणारे व मारणारे एकाच धर्माचे आहेत.
अशा घटनांमध्ये बळी पडलेल्यांना सरळ सरळ ‘डावा’ संबोधले जाते. त्याला डावा म्हटले की उजवे आपोआप मारणाराच्या समर्थनार्थ उभे राहतात व बाकीचे बघ्याची भूमिका घेतात. परंतु जे तटस्थ आहेत तेही मतीगुंग होतात. कारण व्यवहार हत्येचा निषेध करतो तर धर्म मारणाºयांचा सहानूभुतीदार किंवा मूक साक्षीदार बनतो़ म्हणून डाव्यांचा महामेरू कार्ल मार्क्सने धर्माची जी व्याख्या केली ती खरे तर आपल्यासमोर वारंवार अर्धवट मांडली गेली़ त्यामुळे डावे किंवा कम्युनिस्टांना धर्मद्रोही नास्तिक ठरवणे अगदी सोपे झाले. कोणाच्याही तोंडावर ‘धर्म ही अफूची गोळी आहे’ हे सनसनाटी वाक्य फेकलं की पुढच्याची दातखिळी बसते.
तो क्षणार्धात धर्मद्रोही म्हणून जाहीर करून टाकला जातो. डावे किंवा कम्युनिस्ट हे नास्तिक असतील. कर्मकांडाला विरोध करत असतील़ परंतु ते धर्मद्रोही नाहीत़ कारण सुज्ञ माणसांनीच मार्क्सच्या विचारांचा शेंडा व बुडूख खोडले आहे. फक्त एकच वाक्य तेवढे वारंवार वापरून समाजमनात डाव्याबद्दल एक शिक्का मारला आहे.
मार्क्सचे धर्माबद्दलचे संपूर्ण मत पाहिल्यानंतर मार्क्सवादी हे संपूर्ण धर्माचे उच्चाटन करणारे नाहीत, हे स्पष्ट होते. त्याच्या मते एक विशिष्ट सामाजिक अवस्थेत समाज धर्म निर्माण होतो. धर्म हे त्या जगाचे सर्वांगिण तत्त्वज्ञान असते. त्या जगाचा ज्ञानकोश असतो. त्याचे सुबोध तर्कशास्त्र असते़ त्याचा अध्यात्मिक मानबिंदू असतो. त्या जगाचा उत्साह त्याचे नैतिक बळ, त्याची परिपूर्ती, त्याचे सांत्वन आणि समर्थन धर्मात सामावलेले असते. धार्मिक स्वरुपात व्यक्त होणारे दु:ख, हे ख-या दु:खाचे एक रूप आहे आणि त्याचबरोबर त्या दु:खाचा निषेध आहे. धर्म हा दलित जिवांचा उसासा आहे. हृदयशून्य जगाचे ते हृदय आहे. मरगळलेल्या सामाजिक अवस्थेचा तो जीव आहे.
हे सर्व विवेचन तपशिलवार पाहण्याची तसदी घेतली तर धर्म हा माणसाला मानसिक पातळीवर आधार देणारा घटक आहे. तो माणसाला अभासात्मक खोटे सुख देतो़ या अभासाचा त्याग करायचा असेल तर धर्म तयार होण्यास जी परिस्थिती कारणीभूत ठरते, तिचा अंत करावा लागेल. म्हणजे माणसाचे दु:ख दूर करावे लागेल, असा त्याचा सरळसरळ अर्थ आहे. दु:ख व दु:खमय परिस्थिती बदलली म्हणजे त्याला खोट्या आधाराची गरज पडणार नाही, अशी व्यवस्था मार्क्सला हवी होती. हा धर्मद्रोह नव्हता़ परंतु त्याच्या भूमिकेमुळे निर्माण केलेला संभ्रम मात्र होता.
आपण काय करत आहोत, आपल्याकडून कोण काय काम करवून घेत आहे, हा विवेक हरवलेला आहे. त्यामुळे ही वीस, तीस वर्षाची बहुजन बलुतेदारांची मुले अतिशय क्रूर व भयानक डावाला बळी पडत आहेत.
मरणारे गेले आहे. मारणारे तुरुंगात सडणार आहेत. परंतु स्वत:च्या हितसंबंधासाठी हे सर्व घडून आणणारे आणखी तरुणांना धर्माची अफू देऊन पुन्हा नादावणार आहेत. त्यांना काही फरक पडणार नाही. कारण देव, देऊळ, धर्म, कर्मकांड, दक्षिणा व प्रतिष्ठा अबाधित राहणार आहे. धर्माची अफू या सनातन्यांवर चढत नाही. धर्माच्या ठेकेदारासाठी तो फार मोठा व्यवहार आहे़ ते भान ठेवून हा खेळ खेळत आहेत, त्यामुळे ते फसणार नाहीत.
या सर्व प्रकारात वापरली गेलेली तरुण मुले बहुजन समाजाची आहेत, हे विशेष! इथे कोणीही सनातनी नाही. हिंदू ब्राह्मण व सनातनी या सर्वांना एकाच तराजूत मोजल्यास तो डाव्यांवर होणाºया एकतर्फी अन्यायासारखा होईल़ त्यामुळे सनातनी स्वत:चे हितसंबंध अबाधित राखण्यासाठी हे डाव खेळतो आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. कारण जे तरुण हत्याकांड घडवून आणत आहेत, ते ब्राह्मण्यग्रस्त बहुजन आहेत़ तर अशा घटनांचा निषेध करण्यासाठी ब्राह्मण्यमुक्त ब्राह्मण पुढे सरसावले आहेत. यापुढचा सर्वात भयंकर धोका म्हणजे या अफूग्रस्त लोकांच्या निशाण्यावर कोणी शत्रूराष्टÑाचा नागरिक नाही किंवा दुस-या धर्माचा नागरिक नाही तर ते स्वत:च्या धर्माच्या व्यक्तींना संपवण्यासाठी सरसावले आहेत. धर्माचा मुलामा देऊन केलेल्या हत्या सामान्य धर्मश्रद्ध माणसाला पटू शकतात. पाकिस्तान-अफगाणमध्ये सुरुवातीला असाच पाठींबा मिळत गेला. अन् विद्यार्थ्यांतून तालीबानी भस्मासूर कधी उभा राहला़ जेव्हा सर्रास मुस्लिमांची हत्याकांडे होऊ लागली, तेव्हा लोक म्हणू लागले दहशतवादाला धर्म नसतो. त्यामुळे हिंदू दहशतवाद नसेलही कदाचित परंतु जर अशा प्रकारे धर्मांध माणसिकता फोफावली तर ती आज बुद्धीवादी जात्यात आहेत, उद्या सर्वसामान्यही माणूसही जात्यात भरडला जाईल, हे विसरता कामा नये.
सनातन धोक्यात
मार्क्सची अफूची गोळीही संपूर्णपणे सर्व समाजाला लागू झाली नाही़ परंतु तिची वास्तवता मात्र सध्याच्या घडामोडीवरून स्पष्ट होते. काही लोकांना या धर्माच्या अफू ची बाधा झाली आहे. त्याला एक भासमान परिस्थितीत कोणीतरी पोहचवले आहे. तो भास म्हणजे हिंदू धर्म धोक्यात असल्याचा. हजारो वर्षे आक्रमण झेलत या उपखंडात बाराव्या तेराव्या शतकाच्या आसपास हिंदू धर्म लाखोंचे सैन्य घेऊन आलेल्या मोगल राजांमुळे (जे मुस्लीम होते.), नंतर ब्रिटिशांमुळे (जे ख्रिश्चन होते) धोक्यात आला नाही. मग धर्मनिरपेक्ष संविधान कायद्याचे राज्य असताना फक्त लेखणी हाती असलेल्या दहा-पाच लोकांमुळे हिंदू धर्म कसा काय धोक्यात येऊ शकतो? हे वास्तव वेगळे आहे. परंतु जे बुद्धीवाद्यांचे खून पाडत निघालेत त्यांना धर्माची अफू चढली आहे. त्यांच्या भोवती जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती भासमान व खोटी आहे़ हिंदू धर्म धोक्यात आल्याचे भासमान वातावरण त्यांच्या भोवती जाणिवपूर्वक निर्माण करून त्यांच्या हाती शस्त्रे दिली आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या हाती शस्त्रे दिली आहेत, त्याच्या हाती हिंदू धर्म कधीच नव्हता. उलट हे त्याच धर्मव्यवस्थेचे शुद्र समजल्या गेलेल्या जात वर्गातील तरुण आहेत. त्यांना या धर्मव्यवस्थेच्या आर्थिक व्यवस्थेचा काहीही लाभ मिळाला नाही. उलट ते वापरले गेलेले आहेत. ते ज्यांचे खून पाडत आहेत, त्याच्या संपूर्ण कार्याबद्दल ही ते अनभिज्ञ आहेत. त्यांना मार्क्सच्या वाक्याप्रमाणे अर्धवट वाक्य सांगून फसवले जात आहे. म्हणून ते हे भयंकर धाडस करत आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे हे तरुण ज्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी बुद्धीवाद्यांचे खून पाडत आहेत, ते हिंदूच आहेत़ परंतु जे लोक त्यांना वापरून घेत आहेत त्यांचा धर्म वेगळा आहे, हे सुद्धा त्यांना समजले नाही. शंकराचार्य जसे सनातन धर्माचे धर्मगुरू आहेत, परंतु ते हिंदूंना आपले धर्मगुरू वाटतात तसेच सनातन धर्म जो मूठभर लोकांचा आहे, तो हिंदू धर्माच्या आडून सनातन धर्म वाचवण्यासाठी हत्या करत आहेत कारण हिंदू धर्म धोक्यात आलेला नाही तर सनातन धर्म धोक्यात आलेला आहे.
लेखक - लेखक - प्रा.डॉ. बाळासाहेब पवार
(लेखक न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजमध्ये राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)