जामखेडमध्ये धार्मिक स्थळी आढळले १४ परदेशी नागरिक ; तीन ट्रस्टींविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 09:04 AM2020-03-27T09:04:14+5:302020-03-27T09:05:16+5:30
जामखेड शहरात चौदा परदेशी नागरिक एका धार्मिक स्थळामध्ये प्रशासनास कोणतीही माहिती न देता रहात असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी एका धार्मिक स्थळाच्या तीन ट्रस्टी विरोधात गुरुवारी (२६ मार्च) रात्री जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेड : जामखेड शहरात चौदा परदेशी नागरिक एका धार्मिक स्थळामध्ये प्रशासनास कोणतीही माहिती न देता रहात असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी एका धार्मिक स्थळाच्या तीन ट्रस्टी विरोधात गुरुवारी (२६ मार्च) रात्री जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे परदेशी नागरिक आयव्हरी कोस्ट, इराण, टांझानिया देशांतील तर इतर मंबई व तमिळनाडू राज्यातील आहेत. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप मच्छिंद्र आजबे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. दि. २५ मार्च रोजी सकाळी फिर्यादी पो. कॉ. संदीप मच्छिंद्र आजबे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बापू गव्हाणे, गणेश साने व बेलेकर हे त्यांच्या शासकीय वाहनाने जामखेड शहरात जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्रादृर्भाव रोखण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते. याच दरम्यान त्यांना गुप्त खब-यामार्फत माहिती मिळाली होती. जामखेड शहरातील एका धार्मिक स्थळाचे ट्रस्टी समीर बारूद, याकुब तांबोळी व आजीम सय्यद (सर्व रा. जामखेड) यांनी वरील आदेशाची माहिती असतानाही दि. २५ मार्च रोजी या धार्मिक स्थळामध्ये १४ लोक एकत्र जमवून जिल्हाधिका-यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. यावरून वरील तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो. हे. कॉन्स्टेबल बापू गव्हाणे हे करीत आहेत.
१४ जणांना ठेवले निगराणी कक्षात
सर्व १४ परदेशी नागरिकांना नगर येथील निगराणी कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे व वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी दिली. जामखेडमध्ये असताना त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र ते परदेशातून आले असल्याने त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून १४ दिवस अहमदनगर येथे डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात येणार आहे. त्यांना कोणतीही गंभीर लक्षणे नसल्याचा निर्वाळा जामखेड तहसील प्रशासनाने दिला आहे. फक्त बाहेरच्या देशातून आले आहेत म्हणून त्यांना निगराणीसाठी या ठिकाणी ठेवण्यात आले असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी भयभीत होण्याची गरज नाही, असे देखील स्पष्ट केले आहे.