रेमडेसिविरचा हिशेब लागेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:18 AM2021-04-26T04:18:49+5:302021-04-26T04:18:49+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. मागणीपेक्षा कितीतरी पटींनी कमी इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक पद्धत ...
अहमदनगर : जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. मागणीपेक्षा कितीतरी पटींनी कमी इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक पद्धत निश्चित केली आहे. मात्र, ही पद्धत अवलंबविली जात नसल्याने कोणत्या रुग्णालयातील रुग्णांना किती रेमडेसिविर मिळाले, याचा कोणताही हिशेब अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नाही.
त्यामुळे ही इंजेक्शन जातात कुठे? असा सवाल रुग्णांचे नातेवाईक उपस्थित करीत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. रोज तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाही. त्यासाठी नातेवाईक शहरभर फिरतात. मात्र, इंजेक्शन मिळत नाही. नातेवाइकांना कुठेही फिरायची गरज नाही. यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन थेट कोविड हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या मेडिकलला दिले जातात. मात्र, यादीवर उपलब्ध करून दिल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना धावपळ करावीच लागत आहे. मग उपलब्ध झालेले रेमडेसिवीर जातात कुठे? असा सवाल नातेवाईक करीत आहेत.
----------------
...असे आले रेमडेसिविर
२२ एप्रिल- १,३५९
२३ एप्रिल- २,०१६
२४ एप्रिल- ००
२५ एप्रिल- १,१९०
---------------
महापालिकेत इंजेक्शन आले कोठून?
अन्न व औषध प्रशासन, पुणे येथून ठोक विक्रेत्याकडे आलेले रेमडेसिविर थेट कोविड हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या मेडिकलमध्ये पाठविण्यात येतात, तसे अधिकृतपणे कागदावरही येते, तरीही इंजेक्शन न मिळाल्याने रुग्णांचे नातेवाईक, तसेच काही आजी- माजी नगरसेवक, कार्यकर्ते शनिवारी रात्री महापालिकेच्या कार्यालयात आले होते. यावेळी त्यांना संबंधित कार्यालयात पाच रेमडेसिविर आढळून आल्याचा त्यांनी दावा केला आहे. रेमडेसिविर इंजेक्शन वाटपाची पद्धत निश्चित केलेली असेल, तर मग महापालिकेच्या कार्यालयात हे रेमडेसिविर इंजेक्शन आले कोठून, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
--------------
रेमडेसिविर इंजेक्शन किती आलीत, ती कोणाला वाटप केली आहेत, त्याची यादी रुग्णांच्या नावांसह प्रशासनाने दररोज प्रसिद्ध केली पाहिजे. त्यामुळे रुग्णाच्या नावे पाठविण्यात आलेले इंजेक्शन संबंधित रुग्णाला मिळाले का, याची खातरजमा करणे शक्य होईल. सध्या प्रशासनामध्ये कोणताही ताळमेळ नाही.
-सुवेंद्र गांधी, माजी नगरसेवक
--------------
रुग्णासाठी रेमडेसिविर हवे होते. अनेक ठिकाणी धावपळ करून कुठेही रेमडेसिविर उपलब्ध झाले नाही. त्यामुळे नाइलाजाने रुग्णाला बाहेरच्या जिल्ह्यात हलवावे लागले.
-आकाश बोरुडे, मांडवगण, ता. श्रीगोंदा
----------------
रेमडेसिविरबाबत जिल्हाधिकारी काय म्हणाले...
रेमडेसिविरच्या पुरवठ्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी रविवारी सायंकाळी एक व्हिडिओ प्रसारित केला. त्यात त्यांनी सांगितले की, राज्य शासनाने १३ एप्रिल रोजी प्रत्येक जिल्ह्याचा रेमडेसिविरचा कोटा निश्चित केला आहे. उत्पादन झालेल्या रेमडेसिविरपैकी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांच्या
२.३२ टक्के इतके रेमडेसिविर जिल्ह्याला द्यावेत, असा आदेश आहे. सध्या जिल्ह्यात २३ हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यानुसार एकाच दिवशी इंजेक्शन मिळाले. दुसऱ्या दिवशी काहीच मिळाले नाहीत. त्यामुळे सक्रिय रुग्णांच्या ४ टक्के म्हणजे ४,७६० इतके इंजेक्शन जिल्ह्यासाठी मिळावेत, अशी मागणी महसूलमंत्री, पालकमंत्र्यांकडे केली आहे. ज्या खासगी रुग्णालयांचे थेट हिट्रो कंपनीशी करार झालेला आहे, त्या रुग्णालयांना थेट कंपनीकडून जिल्ह्याच्या कोट्यातून रेमडेसिविर मिळतात. राहिलेले रेमडेसिविर वाटपाचे फक्त प्रशासनाकडे अधिकार आहेत. ते रेमडेसिविर थेट कोविड हॉस्पिटलला देण्याचा आदेश दिलेला आहे. हॉस्पिटलला कोटा प्राप्त झाल्यानंतर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनीच रेमडेसिविर द्यायचे की नाही ते ठरवावे, असेही जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले. जिल्ह्याला वाढीव कोटा मिळाल्यानंतरच रेमडेसिविरचा तुडवडा कमी होणार आहे.