मराठा आरक्षणामुळे मंत्र्यांचे दूरवरून देवदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 05:09 AM2018-08-09T05:09:02+5:302018-08-09T05:09:19+5:30
मराठा आंदोलनाबाबत नेते सकारात्मक भूमिका घेत नसल्याने कोणत्याही लोकप्रतिनिधींनी कर्जत तालुक्यातील गोदड महाराज यात्रेला उपस्थिती दर्शवू नये, असा निर्णय स्थानिक सकल मराठा समाजाने घेतला आहे.
अहमदनगर : मराठा आंदोलनाबाबत नेते सकारात्मक भूमिका घेत नसल्याने कोणत्याही लोकप्रतिनिधींनी कर्जत तालुक्यातील गोदड महाराज यात्रेला उपस्थिती दर्शवू नये, असा निर्णय स्थानिक सकल मराठा समाजाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री राम शिंदे यांनी आपल्या मतदारसंघातील या यात्रेला प्रत्यक्ष उपस्थित न राहता दूरवरुनच ‘देवदर्शन’ घेत असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले आहे.
कर्जत येथे संत सद्गुरु गोदड महाराजांची दरवर्षी आषाढीनंतरच्या एकादशीला यात्रा असते. बुधवारी यात्रेला प्रारंभ झाला. यानिमित्त भव्य रथयात्रा निघते. त्याला सुमारे एक लाख लोक जमतात. यात्रेला विविध नेतेमंडळीही हजेरी लावतात. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी कोणत्याही नेत्याने या यात्रेला उपस्थिती दर्शवू नये, असे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे. अनेक राजकारण्यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिकाच जाहीर केलेली नाही. त्यामुळे जनतेत राजकारण्यांबाबत संताप असल्याने अनुचित प्रकार टाळण्यासाठी ही भूमिका घेण्यात आली होती.
त्यामुळे मंत्री शिंदे यांनी यात्रेला उपस्थित न राहण्याचा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला. ‘आरक्षणाच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. दरवर्षी मी यात्रेला उपस्थित राहतो. मात्र, यावर्षी सकल मराठा समाजाच्या भावना विचारात घेता यात्रेला उपस्थित न राहता दूरवरुनच गोदड महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रणाम करतो’, असे त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले आहे.
राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक होणार होती़ परंतु, तीही मराठा आंदोलनामुळे पुढे ढकलली़