रिमांड होममध्ये कोंडलेली मुले सोडा
By Admin | Published: May 15, 2014 11:08 PM2014-05-15T23:08:26+5:302023-12-13T13:24:39+5:30
अहमदनगर : चौकशीच्या नावाखाली रिमांड होममध्ये कोंडलेली मुले सोडा, आमची मुले आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करीत रिमांड होममध्ये आणलेल्या मुलांच्या पालकांनी लता गांधी यांना धारेवर धरले़
अहमदनगर : चौकशीच्या नावाखाली रिमांड होममध्ये कोंडलेली मुले सोडा, आमची मुले आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करीत रिमांड होममध्ये आणलेल्या मुलांच्या पालकांनी बालकल्याण समितीच्या अध्यक्षा लता गांधी यांना धारेवर धरले़ सावली संस्थेत मुलांवर अन्याय होत असल्याची तक्रार नवी दिल्ली येथील मिरॅकल फौंडेशन इंडियाच्या वतीने येथील बालकल्याण समितीकडे करण्यात आली होती़ त्या चौकशीसाठी बालकल्याण समितीने सावली संस्थेतील २१ मुले व ११ मुलींना १० मे रोजी रिमांड होममध्ये ठेवले आहे़ तेव्हापासून ही मुले रिमांड होममध्ये आहेत़ सहा दिवस उलटले तरी मुलांना सोडण्यात आले नाही़ त्यामुळे गुरुवारी (दि़१५) मुलांच्या पालकांनी थेट रिमांड होममध्ये धाव घेतली़ आमची मुले आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी पालकांनी बालकल्याण समितीच्या अध्यक्षा लता गांधी यांच्याकडे केली़ आमच्या मुलांना कोंडण्याचे कारण काय, आमच्या मुलांचा गुन्हा काय, आमच्या मुलांवर कोणीही अत्याचार केले नाहीत, आमच्याकडे मुलांनी कधी तक्रारी केल्या नाहीत़ मग आताच मुलांची चौकशी का, असा सवाल करीत पालकांनी गांधी यांना धारेवर धरले़ मुले ताब्यात मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही येथून हालणार नाही, असा पवित्रा घेत पालकांनी दिवसभर रिमांड होममध्येच ठाण मांडले़ रिमांड होममध्ये मुलांना जेवण मिळत नाही, निकृष्ट जेवणामुळे मुलांना पोट दुखी, उलट्या होणे असे त्रास होत आहेत़ औषधेही वेळेवर दिली जात नाही़ मुलांचे खोटे जबाब नोंदविण्यासाठी रिमांड होमचे कर्मचारी त्यांना मारहाण करतात, असे आरोप गांधी यांच्यासमोरच पालकांनी केले़ सावली संस्थेत आमच्या मुलांनी दहा-दहा वर्षे काढली आहेत़ परंतु कधीही मुलांनी आमच्याकडे तक्रारी केल्या नाही़ मुलांना धमकावून खोट्या तक्रारी लिहून घेणार्या रेखा शिंदे यांना आमच्या ताब्यात द्या, शिंदे यांना तत्काळ बोलावून घ्या अशी मागणी पालकांनी गांधी यांच्याकडे केली़ आम्हाला खायला मिळत नाही, मारहाण होते, असे मुलांनी पालकांना सांगितल्यानंतर पालकांना अश्रू अनावर झाले़ त्यामुळे चिडलेल्या पालकांनी गांधी यांना धारेवर धरले़ गांधी एकट्याच़़़ गुरुवारी पालकांनी रिमांड होममध्ये ठाण मांडल्यानंतर समितीच्या अध्यक्षा लता गांधी यांनी समितीचे सदस्य डॉ़ राजेंद्र पवार, प्रीतम बेदरकर यांना बोलावून घेण्यासाठी दूरध्वनी केले़ मात्र, डॉ़ पवार व बेदरकर हे दोघेही रिमांड होममध्ये आले नाहीत़ त्यामुळे पालकांच्या प्रश्नांना गांधी या एकट्याच उत्तरे देत होत्या़ अखेर पोलीस संरक्षणातच गांधी रिमांड होममधून बाहेर पडल्या़ सावली संस्थेबाबत आमच्या काही तक्रारी नाहीत़ मुलांना येथे का आणले, असे गांधी यांना विचारले़ मात्र, त्या उडवाउडवीची उत्तरे देत आहेत़ मुलींना सहा दिवसापासून अंघोळीला पाणी दिले नाही़ मुलांना उलट्या होत आहेत़ औषधे वेळेवर दिली जात नाही़ त्यांना कोंडून ठेवले आहे़ -गयाबाई खाटेकर, पालक मुलांना धमक्या चौकशीसाठी रिमांड होममध्ये आणलेल्या मुलांशी संवाद साधला असता, मुले म्हणाली, आम्हाला सावली संस्थेत काहीही त्रास नव्हता़ रेखा शिंदे या रात्री आमच्याकडे आल्या आणि मी सांगते तसे लिहा़ नाहीतर तुमच्या सरांना पोलिसांच्या ताब्यात देऊ अशी धमकी दिली़ त्यामुळे आम्ही त्यांच्या सांगण्यानुसार लिहिले़ येथेही आम्हाला सरांच्या विरोधात बोलण्यासाठी मारहाण होते़ येथून तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी दिली जात असल्याचे मुलांनी सांगितले़ मुले ताब्यात द्या तरच बाहेर जा, असा पवित्रा सुशीला चव्हाण, गयाबाई खाटेकर, राजश्री आतकरी, सुरेखा साळवे, मनिषा चव्हाण, रंजना उल्हारी, मनिषा भिंगारदिवे, शेवंता दोंदे आदी पालकांनी घेतला़ त्यामुळे गांधी यांनी पोलीस संरक्षण मागितले़ गुरुवारी दिवसभर रिमांड होमला पोलिसांचा पहारा होता़