प्रांताधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर तत्काळ हातपंप दुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:38 AM2021-02-21T04:38:15+5:302021-02-21T04:38:15+5:30
शेवगाव : प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या सूचनेनंतर अनेक वर्षांपासून बंद असलेला हातपंप तत्काळ दुरुस्त झाला. त्यामुळे शेवगाव शहरातील म्हसोबानगर ...
शेवगाव : प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या सूचनेनंतर अनेक वर्षांपासून बंद असलेला हातपंप तत्काळ दुरुस्त झाला. त्यामुळे शेवगाव शहरातील म्हसोबानगर भागातील कुटुंबाचा तात्पुरता पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. नागरिकांनी प्रांताधिकाऱ्यांचे आभार मानले.
नगरपरिषद प्रशासनातील समन्वयाचा अभाव, उदासीनतेमुळे शहरामधील ग्रामपंचायत काळातील ३० हातपंप दुर्लक्षित होते. त्यातील बरेचसे बंद आहेत. परिसरात हातपंप असूनही नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. प्रशासकपदी प्रांताधिकारी देवदत्त केकाण येताच, त्यांनी अनेक वर्षांपासून बंद असलेले हातपंप दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. त्यामुळे काही प्रभागांतील नागरिकांचा तात्पुरता पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे.
केकाण हे म्हसोबानगरमधील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथील नागरिकांनी जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न त्यांच्यासमोर मांडला. महिलांनी ‘साहेब, या हातपंपाला खूप पाणी आहे, परंतु नगरपालिका दुरुस्त करत नाही,’ असे सांगितले. यावेळी केकाण यांनी कर्मचारी नितीन बनसोडे यांना बोलावून हातपंप दुरुस्ती करणाऱ्यांना बोलावून घ्या व तत्काळ दुरुस्ती करा, अशा सूचना केल्या. त्यानुसार, दुसऱ्याच दिवशी हातपंप दुरुस्त केला गेला. दुरुस्तीनंतर महिलांनी गर्दी करत पंपाची पूजा केली. त्यानंतर, महिलांची पाणी भरण्यासाठी झुंबड उडाली.
---
२० शेवगाव पालिका
शेवगावच्या म्हसोबानगरमधील हातपंप दुरुस्त केल्यानंतर महिलांची झालेली गर्दी.