हीट ॲण्ड रण कायदा रद्द करा; शिव वाहतुक सेनेची तहसीलदारांकडे मागणी
By सचिन धर्मापुरीकर | Published: January 1, 2024 02:15 PM2024-01-01T14:15:35+5:302024-01-01T14:16:06+5:30
शिव वाहतुक सेनेचे उत्तरनगर जिल्हा प्रमुख इरफान शेख यांच्या नेतृत्वाखालील वरील मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
कोपरगाव (अहमदनगर) : केंद्र शासनाचा हीट ॲण्ड रण केसेस कायदा रद्द करावा, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पुरस्कृत शिव वाहतुक सेनेच्या वतीने कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांच्याकडे करण्यात आली. शिव वाहतुक सेनेचे उत्तरनगर जिल्हा प्रमुख इरफान शेख यांच्या नेतृत्वाखालील वरील मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यात केंद्र सरकारच्या हीट ॲण्ड रण केसेस कायद्यांतर्गत अपघात झाल्यानंतर ड्रायव्हरला दहा वर्ष शिक्षा व ७ ते १० लाखापर्यंत दंड या कायद्याचा निषेध करण्यात आला आहे.
हा कायदा हा चालकांवर अन्याय करणारा असून त्याअंतर्गत ड्रायव्हर आपली रोजी-रोटी कमवण्याच्या उद्देशाने रात्रं-दिवस वाहन चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याच्याकडे १० लाख रूपये असते तर त्याने चालक व्यवसाय निवडला नसता. या कायद्यामुळे चालक अपघाताच्या ठिकाणी न थांबता भितीने पळून जातो. अपघातात जखमी व्यक्तीला दवाखान्यात पोहचविण्याची जबाबदारी घेत नाही, तरी हा कायदा केंद्र शासनाने त्वरील रद्द करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. कायदा रद्द न झाल्यास शिवसेना स्टाईलने अहमदनगर जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनावर जिल्हाप्रमुख इरफान शेख यांच्यासह अमजद शेखलाल शेख, सिकंदर कुरेशी, रामदास सुपेकर, इस्माईल पटेल, शेख जाकिर शफी, रोहित सोळसे, हबिब शेख, सोमनाथ खोजे, सद्दाम वहिद पठाण, आल्तमश शेख, आमजत हाशम शेख, मोहसिन अत्तार, अंकुश बुधलकर, जुनैद कुरेशी, दत्तात्रय आटोळे, जाफर जमाल सय्यद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.