निमोणमधील २१ जणांचे अहवाल निगेटिव्ह, ग्रामस्थांचा जीव भांड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 07:40 PM2020-05-21T19:40:51+5:302020-05-21T19:41:33+5:30
तळेगाव दिघे (जि. अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एका ५४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला, तर आणखी एक पुरुष व एक महिला कोरोना बाधित आहे. त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या कोरोनाबाधितांच्या संपर्कातील २१ जणांचे कोरोना तपासणी अहवाल गुरुवारी निगेटिव्ह आले.
तळेगाव दिघे (जि. अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एका ५४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला, तर आणखी एक पुरुष व एक महिला कोरोना बाधित आहे. त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या कोरोनाबाधितांच्या संपर्कातील २१ जणांचे कोरोना तपासणी अहवाल गुरुवारी निगेटिव्ह आले. त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी निमोण गावात कडकडीत लॉकडाऊन सुरु आहे.
कोरोनाबाधितांच्या संपर्कातील २१ जणांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती संगमनेर तालुका पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी दिली. त्याशिवाय पिंपळे येथील एका व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान संगमनेर विभागाचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी गुरुवारी दुपारी निमोण येथे भेट देवून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेतली. प्रांताधिकारी मंगरुळे यांनी सबंधित अधिकारी व कर्मचारी यांना दक्षतेच्या सूचना दिल्या. ग्रामविकास अधिकारी एस. वाय. मिसाळ, बबन सांगळे यावेळी उपस्थित होते. निमोण गावच्या ४३२५ लोकसंख्येपैकी कोरोना बाधित क्षेत्रातील १३७७ लोकसंख्येसाठी आरोग्य विभागाची सहा पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांद्वारे रोज आरोग्य सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निमोण गावात चौदा दिवसांसाठी लॉकडाऊन सुरु करण्यात आला आहे. गावातील अंतर्गत रस्ते रोखण्यात आले आहेत. कोरोनाबाधित परिसर सील करण्यात आला आहे. गावात सध्या पोलीस पथकही तैनात आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरातच सुरक्षित रहावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन कोरोना सुरक्षा समितीने केले आहे.