सहमतीच्या राजकारणाखाली श्रीगोंद्यातील नेत्यांकडून दडपशाही
By Admin | Published: October 10, 2016 12:42 AM2016-10-10T00:42:33+5:302016-10-10T01:01:47+5:30
श्रीगोंदा : कृषी उत्पन्न बाजार समिती व शेतकरी हिताच्या गोंडस नावाखाली सहमतीचे राजकारण करून नेत्यांनी तालुक्याच्या विकासात योगदान देऊ
श्रीगोंदा : कृषी उत्पन्न बाजार समिती व शेतकरी हिताच्या गोंडस नावाखाली सहमतीचे राजकारण करून नेत्यांनी तालुक्याच्या विकासात योगदान देऊ इच्छिणाऱ्या कर्तबगार कार्यकर्त्यांना डावलले व स्वत:चे हितसंबंध जपणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी दोन निवडणुका बिनविरोध केल्या. सत्तेत असलेल्यांनी शेतकरी व संस्थेच्या हिताचा विचार न करता आक्षेपार्ह कारभार केला. आता शेतकरी व कार्यकर्त्यांचे हित व सन्मानासाठी शिवसेना मैदानात उतरली आहे, अशी भूमिका शिवसेना नेते घनश्याम शेलार यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केली.
ते म्हणाले, तालुक्यातील नेत्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक दोन वेळा बिनविरोध केली. सत्तेत असलेल्यांनी गैरकारभार केला व तो लेखा परीक्षणाच्या माध्यमातून पुढे आला. हा गैरकारभार दडपण्याचाही प्रयत्न झाला. यावर उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. न्यायालयाने पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना तत्काळ चौकशी करून कारवाईचे आदेश दिले. याचाच अर्थ सहमती करून सत्तेत बसविलेले कार्यकर्ते, शेतकरी व संस्थेचे हित साधणारे नव्हते हे सिद्ध झाले. त्यामुळे बाजार समितीचे पर्यायाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पदाधिकारी मात्र स्वत:ला प्रस्थापित समजून मिरवू लागले. वास्तविक, कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी प्रामुख्याने ग्रामपंचायत सदस्य व विकास सेवा सहकारी संस्थेचे संचालक हेच मतदार असतात व त्यातूनच उमेदवार निवडणूक लढवू शकतात. गावपातळीवर असे अनेक कर्तृत्ववान व कार्यक्षम कार्यकर्ते होते, जे बाजार समिती, शेतकरी हिताचा कारभार सक्षमपणे पाहू शकत होते, मात्र सहमतीचे राजकारण फक्त आपल्या समर्थकांचे हित जोपासण्यातच या नेते मंडळींनी धन्यता मानून निवडणुका बिनविरोध केल्या व आम्ही ठरवू तेच तालुक्याच्या राजकारणात घडवू ही हुकूमशाहीपद्धती निर्माण केली. म्हणून हक्कासाठी लढायचे, नाकर्त्यांना भिडायचे, अशी शिवसेनेची भूमिका आहे. कालपर्यंत एकमेकांवर आरोपांची चिखलफेक करणारे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी धडपडत होते, मात्र ही निवडणूक शेतकरी हित व कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी लढविण्याचा निर्णय आम्ही घेतला म्हणून ‘त्यांचे’ बिनविरोधचे मनसुबे फोल ठरले. तर त्यातीलच काहीजण गळ््यात गळे घालून आज फिरताना दिसत आहेत. मात्र या सर्व नेत्यांना सूज्ञ मतदार त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत, असे शेलार म्हणाले.
(तालुका प्रतिनिधी)