कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका, श्रीरामपूर पोलिसांची कारवाई
By शिवाजी पवार | Published: April 17, 2023 03:48 PM2023-04-17T15:48:37+5:302023-04-17T15:49:34+5:30
पीकअपसह चालक ताब्यात
श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : शहर पोलिसांनी कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या सात जनावरांची एका वाहनातून सुटका केली. याप्रकरणी पीकअप चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या पथकाने ही कारवाई केली. जीप चालक (एमएच ०४ जीएफ ८७६५) जावेद मुस्ताक कुरेशी (वय २५, रा. बजरंग चौक, श्रीरामपूर) याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोकनगरहून श्रीरामपूरकडे अतिशय निर्दयतेने कत्तल करण्याच्या उद्देशाने जनावरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून हर्षवर्धन गवळी यांनी हवालदार संतोष परदेशी यांना माहिती दिली. हरेगाव फाटा ते शिरसगाव रस्त्याने पोलिसांनी वाहनाचा शोध घेतला असता त्यांना एक पीकअप संशयास्पदरित्या जाताना दिसली. गाडी थांबवून चालकाकडे चौकशी केली असता त्यात २८०० रुपये किमतीची सात लहान वासरे मिळून आली. त्यांची चारा पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती.
पीकअपसह पाच लाख २८०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. पोलीस कर्मचारी शरद अहिरे, किरण पवार, रघुवीर कारखेले, श्रीराम गोसावी यांनी कारवाई केली. शरद अहिरे तपास करत आहेत.