राहुरी कृषी विद्यापीठात संशोधन- रसायनाशिवाय तयार होणार गूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 06:32 PM2018-03-30T18:32:45+5:302018-03-31T05:33:00+5:30
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने को. एम. ९०५७ ही जात संशोधित केली आहे. सेंद्रिय गूळनिर्मितीसाठी ही जात मैलाचा दगड ठरणार असून, १२ ते १४ महिन्यांत ती पक्व होते.
भाऊसाहेब येवले
राहुरी : महाराष्ट्रातील गूळ उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने को. एम. ९०५७ ही जात संशोधित केली आहे. सेंद्रिय गूळनिर्मितीसाठी ही जात मैलाचा दगड ठरणार असून, १२ ते १४ महिन्यांत ती पक्व होते.
सध्या गुळासाठी को ९२००५ ही जात वापरली जाते. मात्र कोल्हापूर वगळता राज्याच्या इतर भागांत या जातीची वाढ व्यवस्थित होत नाही. याशिवाय तांभेरा व तपकिरी ठिपक्यांमुळे गूळनिर्मितीस मर्यादा आल्या होत्या. या त्रुटी दूर करीत खास भेंडीपासून सहज गूळनिर्मितीसाठी पाडेगाव केंद्राने नवीन जात संशोधित केली आहे. मध्यम ते भारी जमिनीत व काही प्रमाणावर चोपण जमिनीवरही ही जात चांगली येते. सेंद्रिय गुळाची देशभर मागणी वाढू लागली आहे़ शेतकऱ्यांना दर्जेदार गूळनिर्मितीसाठी उसाची गरज होती़ त्या दृष्टिकोनातून पाडेगाव केंद्रात सात वर्षांपासून संशोधन सुरू होते़ केवळ भेंडीचा वापर करून तयार केलेला दर्जेदार गूळ परदेशात निर्यात करणे शक्य होणार आहे.
को. एम. ९०५७ उसाचे वैशिष्ट्ये
कोणत्याही रसायनाशिवाय फक्त भेंडीचा वापर करून ए ग्रेडच्या गुळाची निर्मिती शक्य, सरळ वाढ तसेच खोल व काळया जमिनीत लोळत नाही, पाण्याचा ताण सहन करते,वाढ्यावर अजिबात कूस नाही,उसाची जाडी ८३.१७ मिलिमीटर,सरासरी वजन १.६४ किलो, इतर जातीपेक्षा अधिक उत्पादन,कांडी किडीस कमी प्रमाणावर बळी पडते, पानावर तपकिरी ठिपके व तांभेरा या रोगास कमी बळी पडते. तुरा उशिराने व कमी प्रमाणावर येतो, पाचरट सहज निघते, त्यामुळे ऊसतोडणी सहज होते.
को. एम. ९०५७ ही नवीन उसाची जात खास गुळासाठी तयार केली असून, हे वाण सध्या महाष्ट्रात प्रसारित होईल.एप्रिल अथवा मे मध्ये विद्यापीठांच्या बैठकीत हे वाण ठेवण्यात येणार आहे़ त्यानंतर मान्यता मिळणार आहे़ अन्य उसापेक्षा को. एम. ९०५७ या वाणापासून १० ते १२ किलो अधिक गूळनिर्मिती होत आहे. कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांच्या मार्गदर्शनानुसार संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांच्या देखरेखीखाली याचे संशोधन करण्यात आले आहे.
-डॉ. आनंद सोळंके , प्रमुख ऊस पीक शास्त्रज्ञ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव.