महर्षी शिंदे यांच्या विचाराने भारावलेला संशोधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 10:29 AM2019-01-18T10:29:46+5:302019-01-18T10:32:14+5:30

सुधीर लंके महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे आजही समाजाला किती समजले? हा प्रश्न निरुत्तरीत आहे. हयातीत त्यांची उपेक्षा झालीच, ...

Researcher filled with thoughts of Maharishi Shinde | महर्षी शिंदे यांच्या विचाराने भारावलेला संशोधक

महर्षी शिंदे यांच्या विचाराने भारावलेला संशोधक

सुधीर लंके
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे आजही समाजाला किती समजले? हा प्रश्न निरुत्तरीत आहे. हयातीत त्यांची उपेक्षा झालीच, पण, त्यांच्या पश्चातही महाराष्टÑाने त्यांना न्याय दिला असे म्हणता येणार नाही. माजी आमदार डॉ. मा. प. मंगुडकर हे पहिले असे गृहस्थ आहेत जे शासन दरबारी शिंदे यांचा विचार पुढे नेण्यासाठी भांडले. शिंदे यांचे ते पहिले अभ्यासक मानले जातात. भारतभर फिरून त्यांनी शिंदे यांचे साहित्य जमवून प्रकाशित केले. मंगुडकर यांच्या आग्रहामुळेच शासनाने शिंदे यांच्यावर आधारित ‘धर्म, जीवन व तत्वज्ञान’ हे दोन खंड प्रकाशित केले. ‘मंगुडकर उठले कीे महर्षी शिंदे यांचे नाव घेतात’, अशी टीका त्यावेळी त्यांच्यावर झाली. शिंदे यांचे चालते बोलते विद्यापीठ ही उपाधीही त्यांना प्राप्त झाली.
शिंदे यांना ज्यांनी समजावून घेतले ते असेच झपाटले गेले. एस.एम. जोशी, प्रा. एन.डी. पाटील, सदानंद मोरे, डॉ. गो. मा. पवार, भास्कर भोळे, नागोराव कुंभार, शंकरराव कदम, डॉ. नागनाथ कोतापल्ले, कॉ. गोविंद पानसरे, न्यायमूर्ती पी.बी. सावंत हेही शिंदे यांचे मोठे अभ्यासक आहेत. यात संशोधक म्हणून अहमदनगरच्या डॉ. भि. ना. दहातोंडे यांचाही समावेश करावा लागेल. दहातोंडे हे देखील आपले निम्मे आयुष्य शिंदे यांच्यासाठीच जगले. त्यांच्याही नसानसात शिंदे भिनलेले आहेत. दहातोंडे यांनी वयाची पंचाहत्तरी ओलांडली. पण, शिंदेंचा स्मारक ग्रंथ केल्याशिवाय आपल्या आयुष्याला पूर्णता येणार नाही, अशी त्यांची धारणा आहे.
नगरच्या जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या शिक्षण संस्थेत चौदा वर्षे लिपिकाची नोकरी केल्यानंतर ते प्राध्यापक झाले. माजी प्राचार्य ह.की. तोडमल व स. वा. मुळे यांनी त्यांना महर्षी शिंदे यांचे जीवन, चरित्र व कार्य या विषयावर पीएच.डी. करण्याचा सल्ला दिला. म्हणून दहातोंडे त्या वाटेला गेले. त्यानंतर ते शिंदेंचेच झाले. ‘शिंदे यांच्याविषयी जो अभ्यास करेल, तो माझा झाला’, असे मंगुडकर स्कूलचे तत्व आहे. त्यामुळे त्यांनी आपले पुण्यातील घरच दहातोंडे यांच्यासाठी खुले केले होते.
शिंदे यांचा अभ्यास करताना दहातोंडे यांनी जगभरातून संदर्भ मिळविले. त्यांची ही सचोटी कोणत्याही संशोधकाला अनुकरणीय अशी आहे. इंग्लंडमध्ये शिक्षण घेताना महर्र्षींनी १९०१ मध्ये तेथील वृत्तपत्रात ‘भारतातील सामाजिक सुधारणेची अद्भुतता’ हा लेख लिहिला होता. इंग्लंडच्या मँचेस्टर कॉलेजशी पत्रव्यवहार करुन हा लेख दहातोंडे यांनी मिळविला. त्याबद्दल राम बापट व पी.बी. सावंत यांनी त्यांचे खास अभिनंदन केले होते. दहातोंडे यांचे संशोधन फक्त पदवीपुरते मर्यादित राहिले नाही. शिंदे हे त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले. शिंदे यांचा विचार हेच आपल्यासाठी सर्वात मोठे ‘मेडल’ असल्याचे ते मानतात.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे नावाचे प्रतिष्ठानच त्यांनी स्थापन केले. महर्षी शिंदे स्मारक ग्रंथ करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राज्य साहित्य संस्कृती मंडळाने तो प्रकाशित करावा म्हणून त्यांनी अनेक प्रयत्न केले. पत्रव्यवहार केला. एकदा शरद पवार राहुरी कृषी विद्यापीठात आले होते. आम्ही पत्रकार मंडळी पत्रकार परिषदेसाठी पवारांची तेथील विश्रामगृहात प्रतीक्षा करत होतो. तेवढ्यात दहातोंडे हे तेथे धडपडत आले. राजकीय कार्यकर्ते त्यांना ओळखतही नव्हते. हे वृद्ध गृहस्थ येथे कशाला आले? म्हणून सर्वांनाच प्रश्न पडला. सर्व गर्दीत दहातोंडे हे पवारांपर्यंत पोहोचले. कापडी पिशवीतून दोन कागद काढले व पवारांच्या हातात दिले. ‘महर्षी शिंदे यांचा स्मारक ग्रंथ सरकारमार्फत करा. फुले-शिंदे-शाहू- आंबेडकर’ हे सूत्र महाराष्टÑात मांडा, असा आग्रह ते पवार यांना करत होते. शिंदे यांच्याप्रती दहातोंडे यांची असलेली ही निष्ठा पाहून पवारही चकीत झाले.
दहातोंडे अनेकांना भेटले, पण त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश आले नाही. आता प्रतिष्ठानमार्फत वर्गणी जमा करुन शिंदे यांच्यावरील ग्रंथ प्रकाशित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. लहान मुलांना शिंदे समजावेत यासाठी ‘मुलामुलींचे महर्षी शिंदे’ ही गोष्टीरुप पुस्तिका त्यांनी काढली. त्यातील ‘दयाळू विठू’ हा धडा इंग्रजी व हिंदी माध्यमाच्या शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट झाला आहे.
शिंदे हे पहिले असे मराठा होते जे जातीतून बाहेर पडत व्यापक झाले. पुण्याच्या भवानी पेठेत अस्पृश्य वस्तीत ते बायका मुलांसह जाऊन राहिले. ‘न्यायाची चाड, अन्यायाची चीड आणि महाराष्टÑात राहतो तो मराठा’ अशी त्यांनी ‘मराठा’ शब्दाची व्याख्या केली होती.
महाराष्टÑ ‘शाहू, फुले, आंबेडकर’ हे सूत्र मांडतो. पण, त्याऐवजी ‘फुले-शिंदे-शाहू-आंबेडकर’ हे सूत्र स्वीकारायला हवे, असा दहातोंडे व नगरचे निवृत्त प्राचार्य विद्याधर औटी यांचा आग्रह आहे. अस्पृश्यता निवारणात शिंदे यांनी कार्य आरंभिले होते. त्यामुळे त्यांची दखल राज्याने घेतली पाहिजे. शासनानेही ‘फुले-शाहू-आंबेडकर’ या पुरस्काराचे नामकरण’ हे ‘फुले-शिंदे-शाहू-आंबेडकर’ असे करावे, असा दहातोंडे यांचा आग्रह आहे. त्यादृष्टीने ते संधी मिळेल तेथे मांडणी करतात. पीएच.डी. पूर्ण झाली की संशोधक मरतो म्हणतात. पण, दहातोंडे यांचे संशोधन अखेरपर्यंत सुरु आहे. यासाठी त्यांनी प्रसंगी परिवाराकडेही दुर्लक्ष केले.
दहातोंडे यांचे घर पुस्तकांनी भरलेले आहे. प्रचंड ग्रंथ त्यांनी जमविले. कुणालाही हे संदर्भ खुले असतात. पुस्तकांवर एवढा खर्च केल्याने कुटुंब रागवेल या भितीपोटी पुस्तके विकत आणायची व ती मित्रांनी भेट दिली असे भासवायचे, असा पर्याय त्यांनी काढला. हा माणूस अत्यंत भाबडेपणाने व प्रामाणिकपणे जगत आला. महर्षी शिंदे यांच्यावरील दुर्मीळ पुस्तके त्यांनी विद्यार्थ्यांसाठी नगरच्या न्यू, आर्टस् महाविद्यालयात दिली. या महाविद्यालयात शिंदे यांचे दालन असावे, असा आग्रह त्यांनी धरला. ‘मंगुडकर उठले कीे महर्षी शिंदे यांचे नाव घेतात’, अशी टीका झाली. तीच टीका आता दहातोंडे यांच्यावरही होते. एवढी त्यांची या विचारांवर श्रद्धा आहे.
राजकीय नेत्यांचे वाढदिवस, अमृतमहोत्सव साजरे होतात. पण, समाजासाठी चिंतन करणाऱ्या विद्वानांकडे अनेकदा दुर्लक्ष होते. अशाप्रसंगी ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे, प्राचार्य शिवाजीराव देवढे व विविध चळवळीतील मान्यवरांनी एकत्र येत विद्वानांच्या विचारांचा जागर करणारा सोहळा आयोजित करुन समाजाला एक दिशा दिली आहे.

Web Title: Researcher filled with thoughts of Maharishi Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.