धनगर आरक्षणासाठी शेवगावमध्ये मेंढ्यांसह मोर्चाची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 02:49 PM2018-08-14T14:49:03+5:302018-08-14T14:50:00+5:30
धनगर समाजाचा अनुसूचित जमाती आरक्षण प्रवर्गात समावेश करण्यात येऊन त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचया मागणीसाठी मंगळवारी धनगर समाजबांधवांनी काठी अन् घोंगडं घेऊन भंडाऱ्याची उधळण करीत मेंढ्यांसह मोर्चाने शेवगावच्या तहसील कार्यालयावर धडक मारली.
शेवगाव : धनगर समाजाचा अनुसूचित जमाती आरक्षण प्रवर्गात समावेश करण्यात येऊन त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचया मागणीसाठी मंगळवारी धनगर समाजबांधवांनी काठी अन् घोंगडं घेऊन भंडाऱ्याची उधळण करीत मेंढ्यांसह मोर्चाने शेवगावच्या तहसील कार्यालयावर धडक मारली.
शेवगाव शहरातील प्रमुख मार्गाने निघालेल्या या मोर्चात मेंढ्या घेऊन धनगर समाजबांधव प्रचंड संख्येने सहभागी झाले होते. शहरातील खंडोबानगर परिसरातील खंडोबा मंदिरापासून या मोर्चाला सुरूवात झाली. हा मोर्चा बाजारपेठ, शिवाजी चौक, क्रांती चौक, आंबेडकर चौक, गाडगेबाबा चौक या प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयावर पोहचला. तहसीलच्या परिसरात मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले.
काठी, घोंगड्या व मेंढ्यासह भंडा-याची उधळण करीत निघालेला हा मोर्चा शेवगावकरांच्या चर्चेचा विषय बनला होता. निवृत्ती दातीर, आत्माराम कुंडकर, विनायक नजन, माणिकराव निर्मळ, बापूसाहेब तुतारे, शहादेव चितळकर, आदिनाथ खोसे, जगन्नाथ गावडे, आबासाहेब मिसाळ, महेश नवले, कारभारी नजन, सदाशिव आरगडे, भगवान दातीर, हरिभाऊ नजन, महेश नजन आदींनी आपल्या भाषणातून समाजबांधवांची ही महत्त्वपूर्ण मागणी तातडीने मान्य करून संपूर्ण समाजाला दिलासा देण्याची मागणी केली.
‘येळकोट, येळकोट..जय मल्हार’ ने परिसर दणाणला
या जाहीर सभेत विविध मान्यवरांनी धनगर समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी समाजाचा अनुसूचित जमाती आरक्षण प्रवर्गात समावेश होण्याची नितांत गरज व्यक्त केली. येळकोट येळकोट जय मल्हार, आरक्षण आमच्या हक्काचं आदी घोषणांनी शेवगाव तहसीलचा परिसर दणाणून गेला होता.