आरक्षणाचा मार्ग सुकर : धनगर समाजाला झेंडे दाखविण्याची पुन्हा वेळ येणार नाही - पंकजा मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 07:09 PM2019-05-31T19:09:11+5:302019-05-31T19:16:56+5:30
मागील सत्तर वर्षांपासून ‘धनगड’ चा ‘धनगर’ करण्यात काँग्रेसने वेळ घातला.
जामखेड / हळगाव : मागील सत्तर वर्षांपासून ‘धनगड’ चा ‘धनगर’ करण्यात काँग्रेसने वेळ घातला. परंतु आम्ही सत्तेत येताच धनगर समाजाला न्याय देण्यासाठी आदिवासींच्या सवलती देण्याचा निर्णय घेत धनगड व धनगर हे दोन्ही एकच आहेत. यासाठी टिसचा अहवाल मागितला. त्यांनीही सकारात्मक अहवाल दिला. त्यानुसार आम्ही (सरकारने) न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे. आता धनगर समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग सुकर झाला असल्यामुळे आगामी काळात समाजाला काळे झेंडे दाखवण्याची वेळ येणार नाही, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९४ वा जयंती महोत्सव चोंडी कार्यक्रमात ते मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेकापचे आमदार गणपतराव देशमुख होते.
पंकजा मुंडे म्हणाल्या, अहिल्यादेवी यांनी केलेले बांधकाम आजतागायत मजबूत आहेत. पण आघाडी सरकारच्या काळात झालेली बांधकामे फुंकली तरी पडत होती. अहिल्यादेवी व जिजाऊंचा आदर्श घेऊनच मी २०१४ साली संघर्ष यात्रा जिजाऊंच्या जन्मस्थळापासून सुरू करून चोंडी येथे अहिल्यादेवी यांच्या जन्मगावी विसर्जन केले होते. त्यांच्या जयंतीच्या ठिकाणी आम्ही राजकारणाचे जोडे बाजूला ठेवले.
यावेळी खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार विकास महात्मे, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे, आमदार भिमराव धोंडे, आमदार नारायण पाटील, आमदार सुरेश धस, आमदार रामराव वडकिते, रामहरी रूपनवर, माजी मंत्री बबनराव पाचपुते, पोपटराव गावडे, रमेश शेंडगे, प्रकाश शेंडगे, नानाभाऊ कोकरे विजय मोरे, आनंदकुमार पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष रवि सुरवसे, बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती सूर्यकांत मोरे, पणन संचालक पांडुरंग उबाळे उपस्थित होते.
प्रास्ताविक पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन प्रसाद बेडेकर व निलेश दिवटे यांनी तर आभार पांडुरंग उबाळे यांनी मानले.