निधीबाबत महापौरांकडून अन्याय होत असल्याचे सांगत शिवसेनेच्या नगरसेविकेचा राजीनामा
By अरुण वाघमोडे | Published: October 13, 2023 08:46 PM2023-10-13T20:46:17+5:302023-10-13T20:46:37+5:30
शिवसेनेच्या (उबाठा गट) नगरसेविका कमल सप्रे व त्यांचे पती माजी नगरसेवक दत्ता सप्रे यांनी जिल्हा संपर्कप्रमुखांकडे सुपूर्द केला राजीनामा
अरुण वाघमोडे, अहमदनगर: वारंवार पाठपुरावा करूनही प्रभागातील विकासकामांसाठी निधी मिळत नाही तसेच महापालिका प्रशासन, महापौर व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून दुय्यम वागणूक मिळत असल्याचे सांगत शिवसेनेच्या (उबाठा गट) नगरसेविका कमल सप्रे व त्यांचे पती माजी नगरसेवक दत्ता सप्रे यांनी शुक्रवारी (दि.१३) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांच्याकडे पक्षाचा राजीनामा दिला.
सप्रे दाम्पत्यांनी शुक्रवारी आ. शिंदे यांची शिर्डी येथे भेट घेऊन राजीनामा पत्र दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, २०१८ मध्ये मी (कमल सप्रे) नगर शहरातील नागापूर-बोल्हेगाव येथील प्रभाग क्रमांक सातमधून आपल्या पक्षाकडून निवडून आले. बोल्हेगाव येथील रस्त्यासाठी चार-चारवेळा आंदोलन केले मात्र, आच्याकडे दुर्लक्ष केले. प्रभागातील विकासकामांसाठी २४ कोटींचे कामे खतविण्यात आली मात्र, निधी दिला नाही. बोल्हेगाव येथील रस्ता ठेकेदाराने खोदून टाकल्याने नागरिकांना पायी चालनेही कठीण झाले आहे. मनपा प्रशासन व पदाधिकारी नागरिकांना सुविधा देण्यात अपयशी ठरले आहे. पक्षाचा महापौर आणि पक्षाचीच नगरसेविका असतानाही विकासकामे होत नसल्याने नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. आमच्या प्रभागात रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेजची मोठी समस्या आहे. विकासकामांबाबत पक्षातील वरिष्ठांनी केलेल्या अन्यायामुळे व एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पक्षाचा राजीनामा देत असल्याचे असल्याचे या पत्रात म्हटले आहे.