आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदत करण्याचा ठराव
By Admin | Published: September 4, 2015 12:07 AM2015-09-04T00:07:47+5:302015-09-04T00:12:52+5:30
अहमदनगर : शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोण नगर जिल्ह्यात पोहचले आहे. अलिकडच्या काही वर्षात जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत.
अहमदनगर : शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोण नगर जिल्ह्यात पोहचले आहे. अलिकडच्या काही वर्षात जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. या आत्महत्या रोखण्यासोबत, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना जिल्हा परिषदेने प्रत्येक २० हजार रुपयांप्रमाणे मदत करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. हा विषय सभापती शरद नवले यांनी मांडला होता.
गुरूवारी जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन समितीची बैठक झाली. यात सभापती नवले यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेने काही तरी केले पाहिजे. यासाठी प्रत्येकी २० हजार रुपये मदतीचा ठराव यावेळी मांडण्यात आला.
यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात यावी, अशी चर्चा करण्यात आली. त्यावर समितीच्या अन्य सदस्यांनी कायदेशीर बाबी तपासून ही योजना सुरू करण्यास हरकत नसल्याचे मत नोंदवले. जिल्हा परिषद कृषी विभाग तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेट देवून त्यांना कृषी विभागाच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, असे नवले यांनी सांगितले. राष्ट्रीय बायोगॅस योजनेतंर्गत सिलिंडरमुक्त गाव करण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी कृषी व पशुसंवर्धन विभागाने हातात हात हात घालून काम करण्याच्या सूचना दिल्या.
सभेला सदस्या पुनम भिंगारदिवे, उषा कराळे, उषा गोर्डे, पद्मा थोरात, पुष्पा रोहोम, मंगल निमसे, जिल्हा कृषी अधिकारी विलास नलगे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भारत राठोड आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)