‘महाकरंडक’ला राज्यभरातून प्रतिसाद
By Admin | Published: December 22, 2015 11:07 PM2015-12-22T23:07:21+5:302015-12-22T23:11:55+5:30
अहमदनगर : महाकरंडक’ एकांकिका स्पर्धेला यंदा राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, दहा दिवसांत प्राथमिक फेरीसाठी तब्बल ५० प्रवेशिका आल्या आहेत़
अहमदनगर : महाराष्ट्रातील सर्वांत मोठी एकांकिका स्पर्धा म्हणून गौरविलेल्या ‘अहमदनगर महाकरंडक’ एकांकिका स्पर्धेला यंदा राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, दहा दिवसांत प्राथमिक फेरीसाठी तब्बल ५० प्रवेशिका आल्या आहेत़
स्पर्धेच्या अंतिम फेरीला नगर शहरात २१ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे़ यंदा या स्पर्धेचे आयोजन पूर्णत: डिजिटल पद्धतीने करण्यात आले आहे़ प्रवेश अर्ज आॅनलाईन, परीक्षकांचे आयपॅडवर परीक्षण तर सहभागी सर्व कलाकारांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध, असे स्पर्धेचे स्वरुप राहणार आहे़
‘रंगभूमीची रणभूमी’अशा टॅगलाईन असलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून नगरच्या नाट्यक्षेत्राचे चांगलेच ग्लॅमर वाढले आहे़ यंदा या स्पर्धेत स्थानिक कलाकारांनाही मोठी संधी मिळणार आहे़ मागील वर्षी स्थानिक ठिकाणच्या १५ संघांना प्रवेश देण्यात आला होता़ यंदा ही संख्या वाढवून २० करण्यात आली आहे़ स्पर्धेत एकूण ३ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत़ त्यामुळे महाकरंडक स्पर्धेतील सहभागासाठी राज्यभरातील संघांनी रंगीत तालमींना सुरुवात केली आहे़ महाकरंडक एकांकिका स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. अनुष्का मोशन पिक्चर्स अॅण्ड एंटरटेन्मेंट व महावीर प्रतिष्ठानद्वारे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २ ते १० जानेवारी दरम्यान नगर, नाशिक, पुणे, मुंबई, जळगाव, कोल्हापूर, कोकण आणि औरंगाबाद या केंद्रांवर यंदा प्राथमिक फेरी घेण्यात येणार आहे. प्राथमिक फेरीतून दर्जेदार २५ एकांकिकांना अंतिम फेरीत प्रवेश दिला जाणार आहे.