विकेंड लॉकडाऊनला संगमनेर तालुक्यात प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:20 AM2021-04-11T04:20:15+5:302021-04-11T04:20:15+5:30
संगमनेर : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत संपूर्ण राज्यभर शनिवार व रविवार असे ...
संगमनेर : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत संपूर्ण राज्यभर शनिवार व रविवार असे दोन दिवस विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी शनिवारी (दि. १०) संगमनेर तालुक्यात सर्वत्र प्रतिसाद मिळाला. यावेळी विनाकारण बाहेर पडलेल्या नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.
विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी मेडिकल आणि पेट्रोल पंप वगळता सर्वप्रकारची दुकाने बंद होती. नाशिक-पुणे महामार्ग, नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्ग, कोल्हार-घोटी राज्यमार्ग तसेच शहरातील रस्त्यांवर अत्यंत कमी संख्येने दुचाकी, चारचाकी वाहने पाहायला मिळाली. प्रवासी संख्या कमी असल्याने बसस्थानकातून मोजक्याच बसेस बाहेर पडल्या. राज्य परिवहन महामंडळाच्या लांबपल्ल्याच्या नाशिक आणि पुणे जिल्ह्यातून आलेल्या बसेस रस्त्यांवर दिसल्या. शहराला जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रत्येक वाहनाची तपासणी सुरू होती. शहरातील नवीन नगर रस्ता, दिल्ली नाका, अकोले नाका, नाशिक-पुणे महामार्ग आदी ठिकाणी पोलीस उभे होते. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी स्वत: रस्त्यावर उतरून ही कारवाई केली.