जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस प्रतिबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 05:13 PM2019-01-24T17:13:56+5:302019-01-24T17:14:30+5:30
चालू वर्षी कमी असलेले पर्जन्यमान व त्यामुळे उद्भवलेली टंचाईची स्थिती यावर मात करण्यासाठी प्रशासन उपाययोजना करत आहे.
अहमदनगर : चालू वर्षी कमी असलेले पर्जन्यमान व त्यामुळे उद्भवलेली टंचाईची स्थिती यावर मात करण्यासाठी प्रशासन उपाययोजना करत आहे. जिल्ह्यात पाणी टंचाई व जनावरांना चारा टंचाई निर्माण झालेली आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे.
जिल्ह्यामध्ये सप्टेंबरअखेर पडलेला पाऊस सरासरीच्या तुलनेत कमी असल्याने तसेच यापुढील कालावधीमध्ये पावसाची शाश्वती नसल्याने सध्या पाणी टंचाई व जनावरांना चारा टंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे चाºयाची पळवापळवी होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या आणीबाणीच्या प्रकरणी संबंधितावर नोटिसा बजावणे शक्य नाही.
त्यामुळे जिल्हादंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्राप्त झालेल्या आदेशानुसार जिल्ह्यातून चारा वाहतूक करण्यास प्रतिबंध आदेश जारी केला आहे. सदरचा आदेश निर्गमित झाल्यापासून दोन महिन्यांच्या कालावधीकरिता अंमलात राहिल, असेही जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी एका आदेशान्वये कळविले आहे. या आदेशामुळे जिल्ह्याबाहेर चारा न जाता जिल्ह्यातीच जनावरांसाठी उपलब्ध होणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे़