‘लोकमत’ स्टिंगचा परिणाम : मोहरीच्या उद्भवावर अचानक वाढले टॅँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 10:18 AM2019-05-18T10:18:25+5:302019-05-18T10:18:55+5:30
‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशननंतर खडबडून जागे झालेले प्रशासन, सुरू झालेली जीपीएस यंत्रणा यामुळे मोहरी तलाव (ता. जामखेड) येथील उद्भवावर टॅँकरची संख्या अचानक वाढली.
अशोक निमोणकर । संतोष थोरात । सत्तार शेख ।
जामखेड : ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशननंतर खडबडून जागे झालेले प्रशासन, सुरू झालेली जीपीएस यंत्रणा यामुळे मोहरी तलाव (ता. जामखेड) येथील उद्भवावर टॅँकरची संख्या अचानक वाढली. येथे पाणी भरण्याची दोनच ठिकाणे असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. गेल्या चार दिवसात ९६ टॅँकरने होणाऱ्या खेपात प्रचंड म्हणजे जवळपास ७० टक्के घट झाली.
तालुक्यात दुष्काळजन्य स्थिती असून डिसेंबर २०१८ पासून २२ टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. हा आकडा हळूहळू वाढू लागला. फेब्रुवारी महिन्यापासून टॅँकरची संख्या ८० पर्यंत गेली. मार्च अखेरीस टॅँकरची संख्या ९६ पर्यंत गेली. उद्भवाचे ठिकाण तालुक्यातील वाकी व लोणी ठरले होते. नंतर वाकी उद्भवावरील पाणी दूषित असल्याने तेथील उपसा बंद करण्यात आला. मोहरी तलावाशेजारी खड्डे घेऊन तेथून पाईपलाईनने रस्त्यावर टॅँकर भरण्याची सुविधा प्रशासनाने केली.
टॅँकरला जीपीएस यंत्रणाच नसल्याने अनेक चालक उद्भवावर पाणी भरण्यास जात नसत. गावातच अगर आसपास दोन-तीन कि.मी. परिसरात जेथून मिळेल तेथून खासगी व्यक्तीला रोख ठरावीक रक्कम देऊन पाणी गावे, वाड्यावस्त्यांना देत असे. टॅँकर चालकाला मिळणारी रक्कम मात्र उद्भवावरून पाणी भरण्यासाठीचीच मिळत होती. त्यामुळे खर्च कमी आणि आठ तासातच दोन खेपा होऊन टॅँकर मालकाच्या दारात उभा असे.
‘लोकमत’ने ११ मे रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये टॅँकर घोटाळा उघडकीस आला. जीपीएस यंत्रणा सुरू नसणे, लॉगबुक भरलेले नसणे, त्याच्यावर सह्या नसणे आदी गंभीर बाबी त्यावेळी उघडकीस आल्या होत्या. त्यानंतर टंचाई शाखा व प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी तत्काळ संस्थाचालकांना टॅँकरवर शासकीय पाणी कोठून भरले जाते, गावाचे नाव व खेपा असा फलक दर्शनी भागावर लावण्यात सांगितले. लॉगबुकही टॅँकर चालकांकडे उपलब्ध झाले. जीपीएस ट्रॅकिंगही सुरू झाले. त्यानंतर टॅँकर चालकांना थेट उद्भवावर पाणी भरण्यासाठी जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यांचे खासगी ठिकाणाहून पाणी भरणे बंद झाले. त्यामुळे मोहरी तलावातील उद्भवावरील टॅँकरची संख्या अचानक वाढली. तालुक्याला पाणी पुरवठा करणारे संपूर्ण ९६ टॅँकर मोहरी येथेच जाऊ लागले. त्यामुळे चार दिवसांपासून तेथील टॅँकरची संख्या वाढून लांबच लांब रांगा लागल्या. तेथे पाणी भरण्याची दोनच ठिकाणे आहेत.
दोन महिन्यांपासूून तेथे अत्यंत कमी संख्येने टॅँकर भरत होते. त्यामुळे कधी अडचण भासली नाही. मात्र अचानक टॅँकर संख्या
वाढल्याने वीजपुरवठा खंडित होऊ लागला.
त्यानंतर स्थानिक प्रशासन जागे झाले. तलावाशेजारी १०० अश्वशक्ती रोहित्र बसवूनही कमी दाबामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन दिवसाला फक्त ५० टॅँकरची एकच खेप होत होती. त्यामुळे चार दिवसांपासून तालुक्यातील टॅँकरच्या
जवळपास ७० टक्के खेपा कमी झाल्या. त्यामुळे शहरासह तालुक्यातील गावे, वाड्यावस्त्यांवरील नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत.
ठेकेदारावर काय कारवाई होणार?
जामखेड तालुक्यात टॅँकरद्वारे दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. जीपीएस कार्यान्वित नसल्याने उद्भव सोडून इतरत्र टॅँकर भरले जात होते. त्यातूनच मोठ्या प्रमाणावर दूषित पाणी पुरवठा होत होता. ‘लोकमत’च्या स्टिंगनंतर जीपीएस कार्यान्वित झाले. सर्व टॅँकर उद्भवाकडे धावले. यापूर्वी दूषित पाणी पुरविणाºया, उद्भव सोडूून टॅँकर भरणाºया ठेकेदारांवर प्रशासन काय कारवाई करणार? हा प्रश्न आहे.
उद्भवातील पाणी दूषितच..
यावेळी ‘लोकमतच्या टीम’ला ग्रामीण भागासाठी मोहरीच्या उद्भवातून भरले जाणारे टॅँकर दूषित असल्याचे आढळून आले. याबाबत तहसीलदार विशाल नाईकवाडे व गटविकास अधिकारी रूपचंद जगताप यांना छेडले असता ते म्हणाले की, आरोग्य अधिकारी यांना टँकरचे जे उदभव आहेत त्याचे पाणी नमुने तपासून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान या ठिकाणाहून दूषित पाणी पुरवठा होत नसल्याचा दावा दोन्ही अधिकाऱ्यांनी केला.
तहसीलदार, बीडीओंकडून तपासणी
तीन दिवसांपासून तालुक्यात जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या तीन तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या पथकांनी टॅँकर, छावण्यांची पाहणी केली. त्यांनी टंचाई शाखेच्या दप्तराचीही तपासणी केली. ठेकेदाराने सर्व टॅँकरला जीपीएस सिस्टीम बसवली का? चालकाकडे लॉगबुक आहे का? याचीही त्यांनी तपासणी केली.
पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी निधीची टंचाई
मोहरी उद्भवावरून टॅँकर भरण्याची कोलमडलेली यंत्रणा सुरळीत करण्यासाठी तहसीलदार विशाल नाईकवडे, गटविकास अधिकारी रूपचंद जगताप, नगरपरिषद मुख्याधिकारी सुहास जगताप, महावितरण शाखा अभियंता योगेश जगताप यांनी थेट तलावाला भेट दिली. तलाव परिसरात आणखी खड्डे घेऊन शेतकºयांच्या पाईपलाईनने पैठण पालखी मार्गावर पाणी आणले जाणार आहे. तेथून टॅँकर भरले जाणार आहेत. परंतु, या तत्काळच्या खर्चासाठी टंचाई शाखेकडे निधीच नसल्याची यावेळी चर्चा होती. त्यामुळे तहसीलदार व गटविकास अधिकारी खड्डे कसे खोदणार? वीजखांब कसे उभारणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.