अहमदनगर जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींचा सोमवारी निकाल; शहरातील वाहतूक वळविली
By साहेबराव नरसाळे | Published: November 5, 2023 06:44 PM2023-11-05T18:44:03+5:302023-11-05T18:44:20+5:30
जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि.५) उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली.
अहमदनगर : जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि.५) उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात सरासरी ८० टक्के मतदान झाले असून, सोमवारी निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे. नगर शहरातील तहसील कार्यालयात मतमोजणी होणार असून, या पार्श्वभूमीवर नगर शहरातील वाहतूक वळविण्यात आली आहे. नगर तहसील कार्यालयात मतमोजणी असल्यामुळे निकाल ऐकण्यासाठी तहसील कार्यालय परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी शहरातील वाहतूक वळविण्याचा आदेश दिला आहे. प्रोफेसर चौक ते तोफखाना पोलिस स्टेशन चौकादरम्यान वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सोमवारी सकाळी ८ वाजेपासून प्रोफेसर चौक ते तोफखाना पोलिस स्टेशन चौक या दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश मनाई करण्यात आली आहे. भिस्तबाग चौकाकडून तोफखाना पोलिस स्टेशनमार्गे जाणारी वाहने प्रोफेसर कॉलनी चौक येथून -प्रेमदान चौक या मार्गे वळविण्यात आली आहे. तसेच तोफखाना पोलिस ठाण्याकडून येणारी वाहने वसंत किर्ती चौक-गंगा उद्यान मार्गे वळविण्यात आली आहे. तसेच तोफखाना पोलिस स्टेशन चौक-झोपडी कॅन्टीन या मार्गे वळविण्यात आली आहे. निवडणूक निकालासाठी आवश्यक असलेली वाहने, निकालासाठी येणारी वाहने, रुग्णवाहिका, फायर ब्रिगेड वाहने व इतर अत्यावश्यक वाहने वगळता इतर सर्वांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेशात म्हटले आहे.