नगर बाजार समितीमधील व्यवहार पुन्हा सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:22 AM2021-05-21T04:22:17+5:302021-05-21T04:22:17+5:30
केडगाव : सध्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे नगर बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठे ...
केडगाव : सध्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे नगर बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठे नुकसान होत आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून बाजार समितीतील शेतीमालाचे व्यवहार सुरू करण्याची मागणी बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
सध्या कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी सर्व बाजार समितीमधील शेतमालाचे खरेदीविक्रीचे व्यवहार बंद करण्यात आले आहेत. यामुळे नगर बाजार समितीच्या मुख्य आवारातील फळे, भाजीपाला, अन्नधान्य व इतर व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. सध्या वादळी वारा व पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठे नुकसान होत आहे. बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतातच खराब होत असून यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
सध्या खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्री करून बियाणे, खते, औषधे, शेती अवजारे वेळेत मिळणे गरजेचे आहे. यामुळे बाजार समितीच्या मुख्य आवारातील फळे, भाजीपाला व भुसार माल, नेप्ती उपबाजारातील फळे, भाजीपाला व कांदा व्यवहार सुरू केल्यास शेतकऱ्यांच्या शेतीमालाची विक्री हाेईल. आलेल्या पैशांतून शेतकरी खते, बियाणे, शेतीपूरक अवजारे यांची खरेदी करतील. कोरोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करून वेळेची मर्यादा घालून देऊन बाजार समितीतील खरेदीविक्रीचे व्यवहार सुरू करावेत, असे घिगे यांनी निवेदनात म्हटले आहे.