साईनगरीतील ‘जम्बो’ श्वानाचा सेवानिवृत्ती सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 04:44 AM2019-04-21T04:44:51+5:302019-04-21T07:07:27+5:30
अधिकारी, कर्मचारी भावुक; बॉम्ब शोध पथकात दहा वर्षे सेवा
- प्रमोद आहेर
शिर्डी : तब्बल दहा वर्षे साई मंदिर व भाविकांची सुरक्षा करणारा तसेच न चुकता दिवसातील तीन वेळा साई दर्शन घेणारा ‘जम्बो’ श्वान पोलीस दलातून शनिवारी सेवानिवृत्त झाला़ ‘जम्बो’च्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित शानदार कार्यक्रमात पोलीस अधिकारी, कर्मचारीही भावुक झाले होते.
निरोप समारंभाच्या वेळी ‘जम्बो’चे औक्षण करण्यात आले. हार व शाल घालून सत्कार करण्यात आला़ ‘जम्बो’ हा लॅब्रोडर जातीचा श्वान आहे़ जिल्ह्यातील बॉम्ब शोध पथकाच्या निर्मितीतील पहिला श्वान अशी ओळख असलेल्या ‘जम्बो’ला मेडलही मिळालेले होते़ ‘जम्बो’ दोन महिन्याचा असतानाच पोलीस दलात दाखल झाला होता. सहा महिने नगरला प्राथमिक व त्यानंतर पुणे येथे स्फोटके शोधण्याचे सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन तो नव्यानेच सुरू झालेल्या बॉम्ब शोध पथकात सहभागी झाला होता़ वयाची दहा वर्षे पूर्ण झाल्याने शनिवारी तो नियमानुसार सेवानिवृत्त झाला. फुग्यांनी सजविलेल्या नवीन भक्तनिवासाच्या हॉलमध्ये पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ‘जम्बो’ला सेवानिवृत्तीनिमित्ताने निरोप देण्यात आला.
‘जम्बो’चे दररोज साईदर्शन
आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या व सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या साईमंदिर व परिसराची रोज दुपारी व सायंकाळी आरतीपूर्वी तर रात्री मंदिर बंद होण्यापूर्वी ‘जम्बो’ तपासणी करीत असे़ समाधी मंदिरात तपासणीसाठी आल्यावर तो सर्व प्रथम साईसमाधीला प्रणाम करीत असे.
विमानतळाचीही तपासणी
दर दोन दिवसांनी तो शिर्डी विमानतळाचीही ‘जम्बो’ तपासणी करीत असे़ दहा वर्षांतील सर्व व्हीआयपी दौऱ्यात व अन्य घटनातही त्याने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे़ पूर्वी त्याच्यावर जिल्ह्याची जबाबदारी होती. नंतर त्याच्यावर उत्तरेचा कार्यभार होता़