काँग्रेसचे ससाणे यांची माघार
By Admin | Published: December 22, 2015 04:51 PM2015-12-22T16:51:13+5:302015-12-22T16:51:13+5:30
विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे चार दिवस बाकी असताना सोमवारी सायंकाळी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार जयंत ससाणे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली.
अहमदनगर : विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे चार दिवस बाकी असताना सोमवारी सायंकाळी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार जयंत ससाणे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मुंबईत बैठक झाल्यानंतर ससाणे यांना माघार घेण्याचे आदेश काँग्रेसकडून देण्यात आले. पक्षादेश मानून आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे ससाणे यांनी स्पष्ट केले.
जिल्हा काँग्रेस समितीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ससाणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे सभापती बाबासाहेब दिघे, शहराध्यक्ष दीप चव्हाण, सचिन गुजर, विनायक देशमुख, उबेद शेख उपस्थित होते. माघारीबाबत बोलताना ससाणे यांनी स्पष्ट केले, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना काँग्रेस पक्षाने दहा वर्षे आमदार पद दिले. शिर्डी संस्थानचे अध्यक्ष केले. जिल्हाध्यक्ष पद दिले. निवडणुकीत पक्षाच्या आदेशाने निवडणूक अर्ज दाखल केला होता. पक्षाच्या आदेशाने तो कायम ठेवला आणि पक्षाच्या आदेशाने निवडणुकीतून माघार घेत असल्याचे सांगितले.
गत पंचवार्षिकला ही जागा काँग्रेसची होती. त्यावेळी निवडणूक लढवली. मात्र, पराभवास सामोरे जावे लागले. याबद्दल कोणालाही दोष देत नाही. पराभवानंतर पुन्हा सकारात्मक राजकारण सुरू केले. स्थानिक स्वराज संस्थांचे प्रतिनिधी या मतदार संघातील मतदार आहेत. स्थानिक स्वराज संस्थेत काम करण्याची आवड होती. यामुळे निवडणूक लढवण्याची इच्छा होती, असे ते म्हणाले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मुंबईसह राज्यात काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामुळे नगरमध्ये पक्षाने मला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राज्यातील राजकारणात काही राजकीय तडजोडी झाल्या. यात नगरची जागा राष्ट्रवादीला गेली. पक्षाला मानणारा कार्यकर्ता असल्याने या निवडणुकीतून माघार घेत आहे. राज्याच्या राजकारणात पक्षाने माझा वापर केला असेल तर ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे ससाणे शेवटी म्हणाले.
(प्रतिनिधी)