परतीच्या पावसाने आमच्या लक्ष्मीची शेतातच झाली माती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 03:08 PM2019-11-03T15:08:52+5:302019-11-03T15:09:56+5:30
राहाता तालुक्यात उभ्या व सोंगूण पडलेल्या बाजरी, सोयाबीन, मका, कपाशी पिकाला कोंब फुटल्याने या पिकांची अक्षरश: माती झाल्याने दिवाळीची लक्ष्मी घरी येण्याच्या अगोदरच शेतक-यांच्या घरात काळोख पसरला. ‘आमच्या लक्ष्मीची तर शेतातच माती झाली हाय..!’ अशी म्हणण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.
गणेश आहेर ।
लोणी : हातातोंडाशी आलेल्या शेतक-यांच्या पिकलेल्या मालावर सतत बारा दिवसांपासून परतीचा पाऊस घाला घालत आहे. त्यामुळे खरिपांची पिके नेस्तनाबूत झाले. राहाता तालुक्यात उभ्या व सोंगूण पडलेल्या बाजरी, सोयाबीन, मका, कपाशी पिकाला कोंब फुटल्याने या पिकांची अक्षरश: माती झाल्याने दिवाळीची लक्ष्मी घरी येण्याच्या अगोदरच शेतक-यांच्या घरात काळोख पसरला. ‘आमच्या लक्ष्मीची तर शेतातच माती झाली हाय..!’ अशी म्हणण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.
गेल्या दहा-बारा दिवसांपासून राहाता तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. खरीप हंगामात सुरूवातीला पिकांसाठी हवाहवासा वाटणारा पाऊस मागील चार-पाच वर्षाच्या दुष्काळाची झीज नक्कीच भरून काढणार या आशेने शेतकºयांनी यंदा कोणतीही कसर न ठेवता उत्पादन खर्चाला मोकळी वाट करून दिली होती. परंतु पिके काढणीच्या वेळी हाच जास्तीचा पाऊस पिकांसाठी घातक ठरला. बाजरी, मका, सोयाबीन काढणीच्या वेळी हा पाऊस थांबलाच नाही. हाताशी आलेले पीक भिजल्याने मातीमोल झाले. १८ आॅक्टोबरपासून आजतागायत राहाता तालुक्यातील शेतकरी संध्याकाळी तालुक्यात कुठे न कुठे धो-धो पाऊस अनुभवत आहेत.
आतापर्यंत अनेक वेळा पावसाळ्यात भरपूर पाऊस पडला असला तरी तो ठराविक अंतराने उघडिप देत राहिल्याने पिकांना नुकसानकारक ठरत नव्हता. दिवाळीला पण कधी कधी एक-दोन दिवसांचा होत असे. पण यावर्षी परतीचा असा पहिल्यांदा पाऊस पाहिला, असे गोगलगाव येथील आप्पा चौधरी यांनी सांगितले.
दिवाळीच्या सुट्टीला गेलेले कृषी अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी नॉट रिचेबल आहेत. रिचेबल झाले तर फोन उचलायला तयार नाही. मंडल कृषी कार्यालयातील अधिकारी पंचनामे करण्याच्या नावाखाली कार्यालये दिवसभर बंद ठेवत आहेत. हा लोणीच्या मंडल कृषी कार्यालयातील माझा अनुभव आहे, असे गोगलगाव येथील शेतकरी काशिनाथ उगले यांनी सांगितले.
सुरूवातीला झालेल्या पावसावर सोयाबीन, बाजरी पिके पेरली. पण त्यानंतर पाऊस गायब झाला अन सोयाबीन, बाजरीची पिके वाळली. सुकून गेल्याने त्यावरून नांगर फिरवला. चा-यासाठी मका पेरली गेली. शेंडा खाणाºया अळीपासून ती कशीबशी वाचविली पण आता परतीच्या पावसाने हातची गेली, असे शेतकरी पुंजा हरी मगर यांनी सांगितले.