लॉकरबाहेर पडलेले दागिने मूळ मालकाला केले परत : बँक अधिका-यांचा प्रामाणिकपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 04:19 PM2019-02-03T16:19:06+5:302019-02-03T16:19:19+5:30
जिल्हा सहकारी बँकेच्या ब्राह्मणी शाखेच्या लॉकर बाहेर सापडलेले ४ तोळे सोन्याचे दागिने शाखा अधिकारी बाळकृष्ण पंडित यांनी मूळ मालक राधाकिसन बनसोडे यांना प्रामाणिकपणे परत केले.
ब्राह्मणी : जिल्हा सहकारी बँकेच्या ब्राह्मणी शाखेच्या लॉकर बाहेर सापडलेले ४ तोळे सोन्याचे दागिने शाखा अधिकारी बाळकृष्ण पंडित यांनी मूळ मालक राधाकिसन बनसोडे यांना प्रामाणिकपणे परत केले.
राधाकिसन बनसोडे यांनी कार्यक्रमानिमित्त दोन दिवसांपूर्वी जिल्हा सहकारी बँकेच्या ब्राह्मणी शाखेच्या लॉकरमध्ये ठेवलेले एकूण सोन्याच्या दागिन्यांपैकी काही दागिने काढले. दरम्यान आवश्यक असणारे दागिने काढताना ४ तोळे सोन्याचे दागिने गडबडीत खाली पडले. मात्र ही बनसोडे यांच्या लक्षात आली नाही. दुस-या दिवशी बँक कर्मचारी अन दागिने काढण्यासाठी ग्राहक लॉकरकडे फिरकले नाही. परिणामी दागिने जागीच पडून होते. शाखाधिकारी बी. एन. पंडित यांचे तिस-या दिवशी लॉकरकडे लक्ष गेले असता त्यांची नजर खाली पडलेल्या दागिन्यावर गेली. दरम्यान दोन दिवसात लॉकरमधून दागिने काढणा-या ग्राहकांचा शोध घेतला असता बनसोडे यांना बोलावण्यात आले. अन आपण घेवून गेलेल्या दागिन्यांपैकी अन्य दागिने लॉकरमध्ये आहे का? असा प्रश्न ब्राह्मणी शाखेच्या व्यवस्थापणाने बनसोडे यांना विचारला. तात्काळ बनसोडे यांनी लॉकरमध्ये दागिने तपासले असता त्यांना काही दागिने नसल्याचे दिसून आले. शाखा व्यवस्थापणाने सदर दागिन्याची नाव विचारून खात्री पटताच मूळ मालकाकडे शाखाधिकारी बी.एन पंडित यांनी दिले. सोसायटीचे चेअरमन माणिक तारडे, डॉ.राहुल मोकाटे, सोसायटीचे सचिव अशोक आजबे यांच्या साक्षीने लॉकर धारक बनसोडे यांना सुपूर्त केले. यावेळी ब्राह्मणी शाखेचे सूर्यभान हापसे, अष्पाक शेख, शारदा सप्रे आदी उपस्थित होते.
नातेवाईकांच्या लग्नासाठी पत्नीचे गळ्यातील दागिने बँकेच्या लॉकरमधून काढण्यासाठी गेलो असता छोट्या पिशवीतील २ तोळ्याचे दोन लॉकेट नजर चुकीने खाली पडले. शाखा अधिकारी बाळकृष्ण पंडित यांनी चौकशी करून प्रामाणिकपणे पुन्हा केले. - राधाकिसन बनसोडे, ब्राह्मणी