वाळू माफियांवर महसूलमंत्री काहीच बोलत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:15 AM2021-03-29T04:15:18+5:302021-03-29T04:15:18+5:30
राहाता : वाळू माफियांनी सर्वत्र उच्छाद मांडला आहे. यातूनच गावपातळीवर गुन्हेगारी वाढत चालली आहे. या वाळू माफियांवर महसूलमंत्री काहीच ...
राहाता : वाळू माफियांनी सर्वत्र उच्छाद मांडला आहे. यातूनच गावपातळीवर गुन्हेगारी वाढत चालली आहे. या वाळू माफियांवर महसूलमंत्री काहीच बोलायला तयार नाहीत. सरकारही मूग गिळून गप्प आहे. वाळू वाहणाऱ्या बगलबच्चांना पोसण्याचे काम सध्या सुरु आहे, असा थेट आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला. श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या ५९ व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ हे होते. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, कार्यकारी संचालक अभिजीत भागडे, विखे कारखान्याचे कार्यकारी संचालक ठकाजी ढोणे उपस्थित होते. या सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषय सभेपुढे मांडून मंजूर करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के यांनीही ऑनलाईन हजेरी लावली.
निळवंडेसाठी आपण साईसंस्थानचे ५०० कोटी मंजूर करवून घेतले होते. परंतु काही जण न्यायालयात गेले. निळवंडेचे पाणी गणेश परिसरात आले तर हा परिसर सुजलाम सुफलाम होईल. राज्यात माफिया राज सुरु आहे. वाळूवर माफिया पोसायचे आणि माफियांनी गावपुढारी, गुन्हेगारी पोसायची हे काम सुरु असल्याची टीका आमदार विखे यांनी केली. निळवंडेच्या कामांना चालना मिळाल्याबद्दल माजी मंत्री राधाकृष्ण विखे, मधुकरराव पिचड यांच्या अभिनंदनाचा ठरावही सभेत करण्यात आला.
.....