(सुधारित) जिल्ह्यात नेत्यांना धक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:23 AM2021-01-19T04:23:55+5:302021-01-19T04:23:55+5:30
लोकमत न्यूज नटवर्क अहमदनगर : जिल्ह्यातील बड्या नेत्यांना त्यांच्या गावात मतदारांनी राजकीय धक्के दिले आहेत. माजी मंत्री तथा आमदार ...
लोकमत न्यूज नटवर्क
अहमदनगर : जिल्ह्यातील बड्या नेत्यांना त्यांच्या गावात मतदारांनी राजकीय धक्के दिले आहेत. माजी मंत्री तथा आमदार राधाकृष्ण विखे यांच्या लोणी खुर्द ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने दावा ठोकला आहे, तर राम शिंदे यांची चौंडी ग्रामपंचायत काबीज केल्याचा दावाही राष्ट्रवादीने केला आहे. नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगरच्या ग्रामपंचायतीवरील वर्चस्व कायम ठेवल्याचा दावा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या समर्थकांनी केला आहे, तर राहुरी तालुक्यातील महत्त्वाची वांबोरी ग्रामपंचायत विखे गटाकडून ताब्यात घेतल्याचा दावा राज्यमंत्री प्रजक्ता तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने केला आहे.
जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतींच्या ५ हजार ७८८ सदस्यांच्या निवडीसाठी शुक्रवारी मतदान झाले. मतमोजणीला सोमवारी सकाळी प्रारंभ झाला. दुपारपर्यंत सर्वच ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले. ‘लोकमत’च्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींत राष्ट्रवादीच्या गटांनी बाजी मारल्याचा दावा केला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात समर्थकांनी संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायती मिळविल्याचा दावा केला आहे. नगर तालुक्यात माजी मंत्री कर्डिले समर्थकांना धूळ चारल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. परंतु, पारनेर तालुक्यात सेनेची मोठी पीछेहाट झाली. सेनेच्या ताब्यात असलेल्या ८० हून अधिक ग्रामपंचायती ताब्यात घेतल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मंडळाने सोनई ग्रामपंचायतीच्या १६ जागांवर दणदणीत विजय मिळवित माजी खासदार तुकाराम गडाख यांच्या गटाचा धुव्वा उडवला.
अकोले तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने दावा केला आहे. माजी आमदार वैभव पिचड यांच्या समर्थकांनी तालुक्यातील धामणगाव अवारी, कळस, देवठाण, गणोरे ग्रामपंचायतींवरील वर्चस्व राखल्याचा दावा ठोकला आहे. आमदार लहू कानडे व करण ससाणे यांच्या गटाने श्रीरामपूर तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींत विजय मिळविल्याचे सांगितले जात आहे. माजी आमदार भानुदास मुरकुटे व विखे यांच्या गटाला काही ठिकाणी यश मिळाले. कोपरगाव तालुक्यात माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या समर्थकांकडून बहुतांश ग्रामपंचायतींवर वर्चस्व कायम ठेवल्याचे सांगितले जात आहे. परंतु, भाजपच्या ताब्यात असलेल्या महत्त्वाच्या कोकमठाण ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवल्याचा दावा राष्ट्रवादीच्या गोटातून केला जात आहे. भाजपचे आमदार विखे यांच्या नेतृत्वाखालील मंडळांनी बाळेश्वर व हनुमंतगावच्या ग्रामपंचायतीवर ताबा मिळविल्याचा दावा केला आहे. परंतु, लोणी खुर्द ग्रामपंचायत विखे यांच्या हातून निसटली आहे, असे विरोधक म्हणत आहेत.
राहुरी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती ताब्यात घेतल्याचा दावा नगरविकास राज्यमंत्री तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील मंडळांनी केला आहे. जामखेड तालुक्यातील खर्डा, साकत तेलंगशी, खर्डा, चौंडी ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या गटाकडे असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केला आहे. पाथर्डी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्याचा दावा आमदार मोनिका राजळे समर्थकांकडून केला जात आहे. कर्जत तालुक्यातही ग्रा. पं. राष्ट्रवादीकडे आल्याचा फाळके यांचा दावा आहे. मिरजगाव ग्रामपंचायतीत मात्र राष्ट्रवादी व भाजपने प्रत्येकी ७ जागांवर दावा ठोकला आहे. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी त्यांच्या देवगाव ग्रामपंचायतीतील वर्चस्व कायम ठेवल्याचे सांगितले आहे. शेवगाव तालुक्यात घुले यांनी तर श्रीगोंद्यात माजी आमदार राहुल जगताप यांच्या गटाने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर झेंडा फडकविला असल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत.
....