आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत : सकल मराठा समाजाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 11:15 AM2018-07-28T11:15:11+5:302018-07-28T11:15:16+5:30
आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने झालेल्या आंदोलनादरम्यान जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात निरपराध तरूणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अहमदनगर : आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने झालेल्या आंदोलनादरम्यान जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात निरपराध तरूणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाने या मुलांच्या भविष्याचा विचार करून हे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली.
याबाबत शुक्रवारी कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. प्रशासनाला पूर्व कल्पना देऊन नगर शहरात आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यानही पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी दोन वर्षांपासून शांततेच्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत़ राज्यात समाजाच्यावतीने ५६ मूकमोर्चे काढण्यात आले. यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र काही समाजकंटकांकडून मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी दगडफेक, वाहनांची तोडफोड होत असेल तर आम्ही त्यांना पाठीशी घालणार नाही. नगर शहरातील कार्यकर्त्यांनी शांततेत आंदोलन केले आहे. तरी पोलिसांनी काही तरूणांवर गुन्हे दाखल केले आहेत. जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी दगडफेकीचे प्रकार घडले आहेत. अशा प्रकारांना सकल मराठा समाज पाठीशी घालणार नाही.
पोलीस प्रशासनाने निरापराध तरूणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत़ अन्यथा शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.