राष्ट्रीय स्मारकाच्या घोषणाबाजीतच ‘क्रांती’
By Admin | Published: August 8, 2014 11:45 PM2014-08-08T23:45:40+5:302014-08-09T00:22:41+5:30
योगेश गुंड अहमदनगर किल्ल्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याची घोषणा हवेत विरली आहे.
योगेश गुंड अहमदनगर
आॅगस्ट १९४२ च्या क्रांतिमुळे राष्ट्रीय स्तरावर नावलौकीक मिळवलेल्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचे सुशोभीकरण तर रखडलेच पण या किल्ल्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याची घोषणा हवेत विरली आहे. स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाच्या राष्ट्रीय नेत्यांना स्थानबद्ध केल्याने या किल्ल्याचा समावेश राष्ट्रीय दर्जाच्या स्मारकात करण्याबाबत शासन दरबारी फक्त घोषणांचीच क्रांती सुरू आहे.
९ आॅगस्ट १९४२ रोजी झालेल्या आॅगस्ट क्रांतीच्या पार्श्वभूमीवर पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्यासह स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख राष्ट्रीय नेत्यांना अटक करून नगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात जवळपास साडेतीन वर्षे स्थानबद्ध करण्यात आले होते. याच काळात पंडितजींचा ‘डिस्कवरी आॅफ इंडिया’ हा जगप्रसिद्ध ग्रंथ शब्दबद्ध झाला. यादृष्टीने हा किल्ला एका अमोल ग्रंथाची पवित्र भूमी ठरला. पंतप्रधान झाल्यानंतरही पंडितजींनी दोनदा या किल्ल्याला भेट देऊन आपल्या स्थानबद्धतेच्या काळातील आठवणींना उजाळा दिला होता. ज्या खोल्यांमध्ये या राष्ट्रीय नेत्यांना बंदिवासात ठेवण्यात आले होते, त्या खोल्यांचे जतन ७२ वर्षांनंतरही कायम आहे. केवळ पर्यटनाच्या दृष्टीनेच नव्हे तर इतिहास संशोधक व अभ्यासकांसाठी या किल्ल्याचे महत्त्व अनन्य साधारण असल्याने हा किल्ला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित व्हावा, अशी नगरकरांची अनेक वर्षांची मागणी आहे.
किल्ल्याला भेट देणाऱ्या राजकीय नेत्यांकडून राष्ट्रीय स्मारकाच्या दर्जाची फक्त घोषणाबाजी होते.
केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांनी मागील महिन्यात या किल्ल्याला भेट देऊन किल्ला परिसरात फेरफटका मारला. यावेळी त्यांनीही या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन हा किल्ला राष्ट्रीय दर्जाचे स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यापूर्वीही आलेल्या नेत्यांकडून अशीच आश्वासनांची खैरात झाली, मात्र किल्ल्याचे भाग्य काही उजळायला तयार नाही.
११०० कोटींचा आराखडा कागदावरच
नगरचे खासदार दिलीप गांधी यांनी किल्ल्याच्या विकासासाठी व इतर ऐतिहासिक वास्तुंच्या विकासासाठी ११०० कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला आहे. यातून नगरच्या पर्यटन विकासाला चालना मिळवण्याचा उद्देश आहे. मात्र यातील बहुतांशी योजनांसाठी राज्य सरकारचीही आर्थिक मदत लागणार असल्याने या दोन्ही सरकारच्या समन्वयातून हा आराखडा प्रत्यक्षात कधी पूर्ण होईल? असा प्रश्न इतिहास प्रेमींना पडला आहे.
५०० कोटींच्या आराखड्यात नगरचा नंबर कधी?
केंद्र सरकारने ५०० कोटी रुपयांचा पंचवार्षिक पर्यटन विकास आराखडा तयार केला आहे. देशभरातील ५० स्थळांचा त्यात समावेश आहे. येत्या वर्षभरात यातील पाच स्थळांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात येणार आहे. मात्र यात नगरच्या भुईकोट किल्ल्याचा नंबर लागेल का? याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.
मोदींचीच कृपा हवी
४खा.गांधी यांनी किल्ल्याच्या विकासासाठी आराखडा तयार केला तर केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी किल्ल्याच्या राष्ट्रीय दर्जाबाबत प्रस्ताव करू असे आश्वासन दिले. मात्र या दोन्ही प्रकल्पांसाठी आता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच सकारात्मक प्रतिसाद हवा आहे.