नेवासा तालुक्यात क्रांतिकारी पक्षाचा दहा ग्रामपंचायतवर झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 11:32 AM2018-09-28T11:32:58+5:302018-09-28T11:34:06+5:30
तालुक्यात झालेल्या १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाने दहा, भाजपने आठ तर राष्ट्रवादीने तीन ग्रामपंचायतींवर दावा केला आहे.
नेवासा : तालुक्यात झालेल्या १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाने दहा, भाजपने आठ तर राष्ट्रवादीने तीन ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. माजी खासदार तुकाराम गडाख यांच्या पत्नी लक्ष्मी गडाख प्रतिष्ठेच्या पानसवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बहुमताने निवडून आल्या.
कम्युनिस्ट पक्षाचे बाबा आरगडे यांनी सौंदाळा गावात सरपंच पदासह ग्रामपंचायत ताब्यात घेतली. भाजपच्या तीन पदाधिकाऱ्यांनी आपआपले गड राखले.गोमळवाडीतील सरपंच पद तर नांदूरशिकारी मधील एक सदस्य ईश्वर चिठ्ठीच्या आधारे निवडला गेला.
पाथरवालाची निवडणूक बिनविरोध झाली होती. गडाख गटाचा अनेक वर्षांचा बालेकिल्ला असलेल्या घोडेगावसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा यांनी १३०४ मतांच्या मोठ्या फरकाने बाजी मारली. तसेच १७ पैकी १२ जागांवर भाजपचे सदस्य निवडून आले. भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे यांनी देखील आपल्या जायगुडे आखाडा या ग्रामपंचायतीमध्ये एकतर्फी विजय मिळविला. सरपंचपदी इंदुबाई डौले निवडून आल्या. सर्व सदस्य भाजपचे निवडून आले. या दोन्हीही ठिकाणी विरोधकांचा एकही सदस्य निवडून आला नाही. भाजपचे माजी तालुकाध्यक्ष दिनकर गर्जे यांच्या वडुले गावात ते स्वत: पुन्हा एकदा एकतर्फी सरपंच पदी निवडून आले. या ग्रामपंचायतीमध्ये सदस्यपदी सर्व महिला निवडून आल्या आहेत.
भाजपयुमोचे तालुकाध्यक्ष सतीश कर्डिले यांना नांदूरशिकारी या गावामध्ये केवळ २ सदस्यांवर समाधान मानावे लागले. माजी खासदार तुकाराम गडाख यांच्या पानसवाडीत त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई बहुमताने सरपंचपदी विजयी झाल्या. याठिकाणी तुकाराम गडाख यांचे ७ सदस्य निवडून आले. या विजयाने तुकाराम गडाख यांच्या विधानसभेच्या हालचालींना वेग येणार आहे. सौंदाळा गावामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबा आरगडे यांची सून प्रियंका शरद आरगडे या सरपंचपदी विजयी झाल्या.