तांदळी दुमालात कुकडी कालवा तोडला; शेतक-यांच्या घरासह पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 12:02 PM2019-10-12T12:02:58+5:302019-10-12T12:03:03+5:30
श्रीगोंदा तालुक्यात कुकडीच्या मुख्य कालव्याचा दरवाजा अज्ञातांनी उघडून पाणी चारी क्रमांक १३ ला सोडले. गुरुवारी मध्यरात्री झालेल्या या प्रकारामुळे चारीला अचानक पाणी आले. यामुळे आढळगाव शिवारात पुलाच्या नळ्यांमध्ये चारीतील कचरा अडकला. परिणामी पाणी चारीवरून ओसंडून वाहत शेतक-यांच्या घरांसह पिकांमध्ये घुसले. अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले.
आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यात कुकडीच्या मुख्य कालव्याचा दरवाजा अज्ञातांनी उघडून पाणी चारी क्रमांक १३ ला सोडले. गुरुवारी मध्यरात्री झालेल्या या प्रकारामुळे चारीला अचानक पाणी आले. यामुळे आढळगाव शिवारात पुलाच्या नळ्यांमध्ये चारीतील कचरा अडकला. परिणामी पाणी चारीवरून ओसंडून वाहत शेतक-यांच्या घरांसह पिकांमध्ये घुसले. अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले.
सध्या कुकडी कालव्याचे कर्जत तालुक्यासाठी आवर्तन सुरू आहे. श्रीगोंदा तालुक्यातून जाणा-या मुख्य कालव्याचा दरवाजा तांदळी दुमाला शिवारात अज्ञातांनी तोडून पाणी चारी क्रमांक १३ ला सोडून दिले. उपचा-यांचे दरवाजे बंद असल्यामुळे पाण्याचा प्रवाह वेगाने आढळगावकडे झेपावला. परिसरातील शेतक-यांनी चारीमध्ये टाकलेला कचरा आढळगाव-चांडगाव रस्त्यावरील पुलाच्या नळ्यामध्ये अडकला. त्यामुळे पाणी चारीच्यावरून वाहू लागले. नजीकचे शेतकरी जालिंदर शिंदे यांच्या मिरचीच्या शेतात तीन चार फूट पाणी साचले तर देविदास शिंदे यांच्या कांदा आणि डाळिंबामध्ये पाण्यामुळे नुकसान झाले.
बाजीराव भोसले आणि राजू काळे यांच्या घरात मध्यरात्री अचानक पाणी आल्यामुळे लहान मुले घाबरली. कुकडीच्या अधिका-यांना सकाळी कळविल्यानंतर चारीचा दरवाजा बंद करण्यात आला. शुक्रवारी सकाळी दहानंतर पाण्याचा प्रवाह बंद झाला.
नियमित आवर्तनात अडथळा निर्माण करण्याच्या हेतूने अज्ञातांनी दरवाजा उघडला होता. त्यासंदर्भात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, असे श्रीगोंदा येथील सिंचन शाखेचे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांनी सांगितले.