तांदळे टोळीने बनविले होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:18 AM2021-05-30T04:18:28+5:302021-05-30T04:18:28+5:30
अहमदनगर : कुप्रसिद्ध नयन तांदळे व त्याच्या साथीदारांनी पोलिसाच्या नावे बनावट ओळखपत्र तयार केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा ...
अहमदनगर : कुप्रसिद्ध नयन तांदळे व त्याच्या साथीदारांनी पोलिसाच्या नावे बनावट ओळखपत्र तयार केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी महेश साहेबराव ससे (रा. जेऊर, ता. नगर) यांनी फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी नयन तांदळे व त्याच्या साथीदारांविरोधात चोरी, बनावटीकरण या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तांदळे व त्याच्या साथीदारांनी २१ डिसेंबर २०२० रोजी महेश ससे यांचे नगर-मनमाड रोडवरील एका चहाच्या टपरी जवळून पाकीट चोरले होते. पाकिटात असलेल्या ससे यांच्या फोटोचा गैरवापर करून त्याचे पोलीस विभागाचे बनावट ओळखपत्र तयार केले.
दरम्यान, तांदळे याच्यासह त्याच्या साथीदारांविरोधात नुकताच मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके हे करीत आहेत. तपासादरम्यान तांदळे टोळीने पोलीस विभागाच्या नावे बनावट ओळखपत्र तयार केले असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून ससे यांचे चोरलेले एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड आधी मुद्देमाल जप्त केला. पोलिसाचे बनावट ओळखपत्र तयार करून तांदळे टोळीने काय गुन्हे केले आहेत, याचा तपास उपअधीक्षक मिटके हे करीत आहेत. यातून आरोपींचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता मिटके यांनी वर्तविली.