निघोज कुंडात रिक्षा चालक वाहून गेला, प्रशासनाकडून शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 16:06 IST2020-10-21T16:05:12+5:302020-10-21T16:06:32+5:30
पारनेर तालुक्यातील निघोज कुंडामध्ये रिक्षाचालक पाय घसरून पडला आहे. अद्याप त्याचा शोध लागला नाही. पोलीस प्रशासनाकडून शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.

निघोज कुंडात रिक्षा चालक वाहून गेला, प्रशासनाकडून शोध सुरू
निघोज : पारनेर तालुक्यातील निघोज कुंडामध्ये रिक्षाचालक पाय घसरून पडला आहे. अद्याप त्याचा शोध लागला नाही. पोलीस प्रशासनाकडून शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. दुसर्या दिवशीही शोध सुरूच होता.
मंगळवारी (दि.२०) रोजी आशा सुरेश जगदाळे (वय ४५, रा.रांजणगाव, ता. शिरूर) व इतर तीन महिलांसह इसाक रहमान तांबोळी (वय ३५) यांच्या रिक्षामधून जवळा येथे त्यांच्या मुलीला फराळ घेऊन आल्या होत्या. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फराळ देऊन परतत असताना या महिला निघोज कुंड पर्यटन क्षेत्र येथे दर्शनासाठी थांबल्या. त्यावेळी रिक्षा चालक निघोज कुंड येथे हातपाय तोंड धुण्यासाठी गेला असता शेवाळ असल्यामुळे तो पाय घसरून कुकडी नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेला. वाहून जात असताना तेथील लोकांनी पाहिले. आरडाओरडा केली. मात्र तोपर्यंत तो कुंडात वाहून गेला होता.
स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत पारनेर पोलीस स्टेशनला माहिती कळवली. त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या परिसरामध्ये तांबोळी याचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.