रिक्षाचालकांचे अर्थचक्र बिघडले;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:19 AM2021-02-14T04:19:51+5:302021-02-14T04:19:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर: दिवसभर रिक्षा चालवून हातात कसेबसे चारशे ते पाचशे रुपये पडतात. महिन्याकाठी दहा ते बारा हजार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: दिवसभर रिक्षा चालवून हातात कसेबसे चारशे ते पाचशे रुपये पडतात. महिन्याकाठी दहा ते बारा हजार रुपये एवढीच कमाई. या पैशांतून दैनंदिन उपजीविका, घरभाडे, मुलांचे शिक्षण आणि आजारपणाचा खर्च भागवावा लागतो. कुटुंब चालविताना जीव मेटाकुटीस येतो, अशी व्यथा नगर शहरातील रिक्षाचालकांनी मांडली.
परमीट खुले झाल्याने एकट्या नगर शहरात साडेसात हजारपेक्षा जास्त रिक्षा आहेत. गेल्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसची सातत्याने दरवाढ होत असल्याने महागाई वाढली आहे. नगर शहरातील ९५ टक्के रिक्षा एलपीजी गॅसवर चालतात. या गॅसचेही दर वाढले आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांचे अर्थचक्र बिघडले आहे. उदरनिर्वाहासाठी अनेक रिक्षाचालक पार्टटाइम नोकरी करत आहेत. वाहतूक नियमानुसार रिक्षात तीनपेक्षा जास्त प्रवासी घेता येत नाहीत. शहरातील बहुतांशी रस्ते खराब असल्याने ॲव्हरेज मिळत नाही. रिक्षा खराब झाली तर त्या खर्चाचा भार वेगळाच. अशी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले.
------------------------------
पाच रुपयांसाठी भांडणे
प्रवासी रिक्षात बसतात तेव्हा बहुतांशी जण प्रवासभाड्यासाठी वाद करतात. पाच-पाच रुपयांसाठी भांडण करतात. प्रवाशांची संख्या घटल्याने अनेकदा ॲडजेस करून व्यवसाय करावा लागतो. तीनपेक्षा जास्त प्रवासी घेतले तर पोलीस दंड करतात. त्याचाही खर्च वाढत असल्याचे अनेक रिक्षाचालकांनी सांगितले.
-----------------------------
नगरमध्ये प्रवाशांसाठी बसची व्यवस्था असल्याने रिक्षात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली आहे. लॉकडाऊनकाळात रिक्षा बंद होत्या. त्यामुळे रिक्षाचालकांची मोठी आर्थिक अडचण झाली. दिवसभर रिक्षा चालवूनही अपेक्षित पैसे मिळत नाहीत. त्यामुळे मी एमआयडीसीत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करतो. ती ड्युटी संपल्यानंतर रात्री रिक्षा चालवितो. यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. शासनाने रिक्षाचालकांसाठी सुविधा देणे गरजेचे आहे.
- हरीश डोळसे, रिक्षाचालक .
--------------------------------
लॉकडाऊननंतर कशाबशा रिक्षा सुरू झाल्या. दिवसभर आणि रात्री काही वेळ रिक्षा चालविल्यानंतर कशीबशी राेजंदारी निघते. महागाई वाढल्याने या पैशातून कुटुंबाचा खर्च भागविणे कठीण जाते. त्यातच रिक्षांची संख्या वाढल्याने प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे सर्वच रिक्षाचालकांचे अर्थचक्र बिघडले आहे.
- गणेश पाचारणे, रिक्षाचालक
....................................
फोटो १३ रिक्षा १, २