मुळा धरणाच्या उजव्या कालव्याचे आवर्तन लांबणीवर; पाणी सोडण्यासाठी शेतक-यांचा दबाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 05:39 PM2020-03-15T17:39:36+5:302020-03-15T17:40:38+5:30
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.२७९ पाणी वापर संस्थांनी आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे. आतापर्यंत २० हजार हेक्टर क्षेत्रासाठी पाणी नोंदणी झाली असून आणखी १५ हजार हेक्टर पाणी मागणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राहुरी : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.२७९ पाणी वापर संस्थांनी आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे. आतापर्यंत २० हजार हेक्टर क्षेत्रासाठी पाणी नोंदणी झाली असून आणखी १५ हजार हेक्टर पाणी मागणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुळा धरणाचा डावा कालवा १० मार्चला सुरू करण्यात आला. डाव्या कालव्याखाली १३० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर करण्यात आला आहे. साडेतीन हजार हेक्टर क्षेत्र डाव्या कालव्याखाली ओलीताखाली येण्याची शक्यता आहे. उजव्या कालव्यातून चार दिवसात पाणी सोडण्यात येईल, अशी घोषणा ९ मार्चला मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली होती. त्यानंतर दुस-या दिवशी डाव्या कालव्यातून आवर्तन सुरू झाले. १३ मार्चच्या दरम्यान उजव्या कालव्यातून पाणी सुटण्याची शक्यता होती़. मात्र अद्याप पाणी न सुटल्याने शेतक-यांचे लक्ष पाटबंधारे खात्याकडे वेधले आहे.
मुळा धरणाच्या उजव्या कालव्याखाली २७९ पाणी वापर संस्था आहेत. पाणी वापर संस्थांनी पाटबंधारे खात्याकडे पाण्याची मागणी नोंदविली आहे. उन्हाची तीव्रता वाढलेली आहे़ त्यामुळे उजव्या कालव्याखालील पिकांची भूक वाढलेली आहे. पाणी कधी सोडणार? असा पश्न शेतकरी विचारत आहेत.
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून १३ मार्चला पाणी सुटणार असल्याचे मंत्री महोदयांनी जाहीर केले होते़. प्रत्यक्षात रविवारी दुपारपर्यंत पाणी सुटलेले नाही़. त्यामुळे ऊस लागवडी धोक्यात आल्या आहेत़. याशिवाय कांदा, गहु पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत़. उन्हाची तीव्रता वाढली असून पाटबंधारे खात्याने त्वरीत उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे़, अशी खडांबे खुर्द येथील शेतकरी विठ्ठल कार्ले यांनी सांगिेतले.
मुळा उजव्या कालव्याखाली २० हजार हेक्टर पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. उजव्या कालव्यातून महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी ६० क्युसेकने पाणी परवापासून सुरू आहे. धरणात सध्या २० हजार ३०२ दशलक्ष घनफूट पाणी साठा उपलब्ध आहे. वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येईल़, असे मुळा धरणाचे अधीक्षक अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी सांगितले.