शिक्षण हक्क कायदा : नगर जिल्ह्यात पहिलीसाठी ५ हजार २१४ जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 04:19 PM2018-02-08T16:19:46+5:302018-02-08T16:20:12+5:30
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यीत शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद आहे.
केडगाव : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यीत शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद आहे. पूर्व प्राथमिक व प्राथमिक जागांसाठी आॅनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी दिली.
२०१४ पासून प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन पध्दतीने करण्याची कार्यपद्धती सरकारने निश्चित केली आहे. यानुसार नगर जिल्ह्यात मनपा व नगर तालुका अशा दोन तालुक्यांची प्रायोगिक तत्वावर २५ टक्के प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन राबविण्यात आली. सन २०१६ -२०१७ मध्ये संपूर्ण जिल्ह्यात प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन राबविण्यात आली. शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिक सामाजिक दुर्बल तसेच विधवा,घटस्फोटीत ,अनाथ व दिव्यांग बालकांना दर्जेदार शाळेत मोफत प्रवेश घेता येणार आहे. पालकांनी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यात इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांवर मदत केंद्राची स्थापना करून त्यामार्फत अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध केली असून मदत केंद्रांची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
सन २०१८- २०१९ ची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून पालकांनी दि.७ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी पर्यंत आॅनलाईन पद्धतीने आपल्या पाल्याचे प्रवेश अर्ज भरावे असे आवाहन शिक्षणाधिकारी काठमोरे यांनी केले. जिल्ह्यात एकूण ३९५ शाळा पात्र असून पूर्व प्राथमिक वर्गासाठी १६८ जागा रिक्त व प्राथमिक ( पहिली) साठी ५ हजार २१४ जागा रिक्त जागा आॅनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहे.