भंडारदरा-मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रिमझिम पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 12:36 PM2020-06-30T12:36:01+5:302020-06-30T12:36:06+5:30

अकोले : आर्द्रा नक्षत्राच्या आषाढसरींची भुरभुर सोमवारी शहर परिसराने अनुभवली तर सायंकाळी भंडारदरा व मुळाधरण पाणलोटातील हरिश्चंद्रगड- रतनगड- घाटघर-कळसूबाई परिसरात हलका ते मध्यम पाऊस सुरू झाला.

Rimjim rains in the catchment area of Bhandardara-Mula dam | भंडारदरा-मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रिमझिम पाऊस

भंडारदरा-मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रिमझिम पाऊस

अकोले : आर्द्रा नक्षत्राच्या आषाढसरींची भुरभुर सोमवारी शहर परिसराने अनुभवली तर सायंकाळी भंडारदरा व मुळाधरण पाणलोटातील हरिश्चंद्रगड- रतनगड- घाटघर-कळसूबाई परिसरात हलका ते मध्यम पाऊस सुरू झाला. दुबार पेरणीचे संकट सध्या टळले असले तरी शेतकºयांना आषाढाच्या जोरदार सरींची आस लागली आहे. भंडारदरा धरणात यंदा केवळ साडेसात टक्के नवे पाणी आले असून आजमितीस २६ टक्के जलसाठा आहे. 


यावर्षी २९ जून २०२०ला घाटघर येथे अवघा १६ तर पांजर येथे १५ मिलीमीटर पाऊस झाला. गत वर्षी २९ जून २०१९ ला जिल्ह्याची चेरापुंजी घाटघर येथे ११५ मिलीमीटर म्हणजे पावणेपाच इंच पाऊस पडल्याची नोंद होती. यंदा मात्र पावसाच्या आगारातच पावसाने दडी मारल्याने भात उत्पादक आदिवासी शेतकºयांची चिंता वाढली आहे.
तालुक्यातील पश्चिम घाटमाथ्यावरील डोंगर-शिखरांशी ढगांची झुंबी होत मान्सून सक्रिय होण्याची वाट शेतकरी पाहत आहे. जोराचा पाऊस आला तरच तरारलेल्या भात रोपांची आवणी सुरु होईल. 


भंडारदरा धरणात सोमवारी नव्या २३ तर  १ जून २०२० पासून ८३४ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे. मात्र वीजनिर्मिती चालू प्रकल्प असल्याने भंडारदरा धरणातून ८१९ क्युसेकने निळवंडेत पाणी सोडले जात आहे. १९८ दलघफू क्षमतेचा आंबीत लघु पाटबंधारे तलाव ओसंडून वाहू लागला आहे. तालुक्यातील इतर तेरा छोटे लघुपाटबंधारे प्रकल्प मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मुळानदी वाहती होत पिंपळगावखांड प्रकल्पात पाण्याची आवक सुरु झाली, मात्र ती अल्प आहे. चार दिवसांपूर्वी तालुक्यात शुक्रवारी २५ तारखेला अकोले शहर परिसरात ६६ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. वातावरणातील उकाडा वाढला आणि आकाशात ढग जमा होताना दिसत आहेत, पण पाऊस बरसत नाही अशी स्थिती होती. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी सायंकाळी उशिरा पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली. भाताची रोपे तरारली असून भातशेती मशागतीलाही काही ठिकाणी सुरुवात झाली आहे.  भंडारदरा धरणात २ हजार ८५० दशलक्ष घनफूट तर निळवंडे धरणात ३ हजार ९२० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आजमितीस आहे. १ हजार ६० दलघफू क्षमतेच्या आढळा धरणात ३८० पाणीसाठा आहे. मुळा धरणाचा सध्याचा पाणीसाठा ७ हजार ३३४ दलघफू असून यंदा केवळ ५१२ दलघफू नव्या पाण्याची आवक आतापर्यंत झाली आहे. पाऊस सुरु होताच तालुक्यातील रस्त्यांमधील खड्ड्यांची तोंड उसवू लागली आहेत. अकोले परिसरात खड्ड्यांमध्ये पाणी साठल्याने गाळ राबडीतून गाड्यांना वाट काढावी लागत आहे.

Web Title: Rimjim rains in the catchment area of Bhandardara-Mula dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.