पाणी भरण्यावरून दंगल : तीन जखमी, ४१ जणांवर गुुन्हा दाखल, १४ अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 01:53 PM2019-05-11T13:53:25+5:302019-05-11T13:56:57+5:30
येथील तपनेश्वर गल्लीतील कुंभारतळ येथे गुरुवारी सायंकाळी सहा वाजता नळावर पाणी भरण्यावरून दोन गटात काठी, दगड व कोयत्याचा वापर होऊन दंगल झाली़
जामखेड : येथील तपनेश्वर गल्लीतील कुंभारतळ येथे गुरुवारी सायंकाळी सहा वाजता नळावर पाणी भरण्यावरून दोन गटात काठी, दगड व कोयत्याचा वापर होऊन दंगल झाली़ या दंगलीत तीन जखमी झाले आहेत. दोन गटात झालेल्या दंगलीवरून परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत. त्यानुसार एकूण ४१ जणांवर गुुन्हा दाखल झाला आहे. तर १४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत जामखेड पोलिसांत पुष्पा रोहिदास डोकडे (वय ३५, रा. कुंभारतळ, जामखेड) या महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी सायंकाळी नळाचे पाणी भरत असताना आरोपी बंड्या उर्फ अबुजर अजीज बागवान फिर्यादी पुष्पा डोकडे यांच्यामध्ये कोण अगोदर पाणी भरणार यावरुन वाद झाले़
यावेळी बागवान यास राग आल्याने त्याने डोकडे यांना शिवीगाळ, दमदाटी केली़ तसेच शाहीन बागवान, रेश्मा बागवान, अस्लम बागवान, पप्पू शेख, तरबेज बागवान, रईस बागवान, फिरोज सय्यद, अय्युब बागवान, साहील बागवान, फारूख बागवान, अय्यास बागवान, अजिज बागवान, फिरोज बागवान, आयशा बागवान, (रा. बाजारतळ, जामखेड) व इतर ३ ते ४ अनोळखी इसम यांनी पुष्पा डोकडे हिची नणंद अंजना पवार व त्यांचा मुलगा आकाश पवार यास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी फिर्याद शाहीन अजिज बागवान (वय ३५, रा. कुंभारतळ) या महिलेने दिली असून त्यामध्ये म्हटले आहे की, गुरुवारी सायंकाळी सहा वाजता तपनेश्वर गल्लीतील सार्वजनिक नळावर पाणी भरत असताना आरोपी बाळू डोकडे याची पत्नी व मुलगी (नाव माहीत नाही), राजू डोकडे, नितीन डोकडे, रोहित पवार, आकाश डोकडे, योगेश डोकडे, सागर मोहळकर, राजू फुलमाळी, सुरेश फुलमाळी, सुभाष फुलमाळी, सुरज पवार, सचिन डोकडे (रा. जामखेड), सुदाम भिसे (बटेवाडी), अंकुश काळे (आळजापूर, ता. करमाळा, जि. सोलापूर) व इतर ५ जणांनी अगोदर पाणी भरुन द्यावे, यासाठी वाद घातला़ तसेच फिर्यादी शाहीन बागवान हिचा दिर याकूब अकबर बागवान यास संदीप डोकडे या आरोपीने त्याच्या हातातील दगड मारून जखमी केले़ यावरून पोलिसांनी २१ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील सुरज पवार, राजू डोकडे, बाळू भिसे, अंकुश काळे, काजल डोकडे, पुष्पा डोकडे, अबुजर बागवान, साहील सय्यद, फारूख सय्यद, अय्यास बागवान, शाहीन बागवान, अजिज बागवान या आरोपींना अटक केली आहे.
तीन पथकांची नियुक्ती
शहरातील पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे दोन गटात दंगल झाली असून अनेक ठिकाणी पाण्यावरून मारामारीच्याही घटना घडल्या आहेत. गुरुवारी शहरातील तपनेश्वर भागात झालेल्या दोन गटातील दंगलींमुळे अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल तसेच पोलीस उपाधीक्षक यांच्या पथकांना पाचारण करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस उपाधीक्षक संजय सातव हे शुक्रवारी दिवसभर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर गोरे व जामखेड पोलिसांनी दंगलीतील आरोपी पकडण्यासाठी परिश्रम घेतले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलीस फरार आरोपींच्या शोधात आहे.