भेंड्यातील हल्लाप्रकरणी दंगलीचा गुन्हा
By Admin | Published: October 15, 2016 12:34 AM2016-10-15T00:34:11+5:302016-10-15T00:54:02+5:30
भेंडा : भेंडा (ता. नेवासा) येथील मोबाईल शॉपी व दुकान मालकाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी अतिक शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नेवासा
भेंडा : भेंडा (ता. नेवासा) येथील मोबाईल शॉपी व दुकान मालकाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी अतिक शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नेवासा पोलिसांनी पाच जणांविरुध्द खुनाच्या प्रयत्नासह दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घटनेतील आरोपी अद्याप फरार आहेत.
अतिक अब्दूल रशिद शेख (वय ३७, रा. भेंडा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, गुरुवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास देवा कान्हू धनवडे, सुरेश कान्हू धनवडे, हिरालाल सीताराम धनवडे व इतर दोन अनोळखी (सर्व रा. भेंडा खुर्द) दुकानात आले. देवा धनवडे याने मोबाईल रिचार्ज न केल्याच्या रागातून शिवीगाळ करुन धमकी दिली. व लोखंडी पाईपने दुकानाच्या काऊंटरचे नुकसान करुन काचा फोडल्या. दुकानाचे नुकसान केल्याप्रकरणी जाब विचारल्यानंतर माझ्या कपाळावर मारहाण करण्यात आली.
सुरेश धनवडे याने बाटलीतील पेट्रोल दुकान व माझ्या अंगावर फेकले. मी घाबरून दुकानाबाहेर जात असताना हिरालाल धनवडे याने काडी पेटवून अंगावर फेकली. ती झटकून मी जीव वाचविण्यासाठी बाहेर पळत असताना देवा धनवडे याने माझा डावा हात व डोक्यावर पाईपने मारहाण केली. मी ओरडा केल्यानंतर इतर आरोपींनी दमदाटी देऊन शिवीगाळ केली. व आमच्या नादी लागला तर जीवे मारु, अशी धमकी दिली, असे अतिक शेख यांनी तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेतील आरोपी देवा कान्हू धनवडे यास शुक्रवारी सायंकाळी गोेंडेगाव शिवारात अटक करण्यात आली. अतिक शेख यांच्या तक्रारीनुसार नेवासा पोलिसांनी वरील आरोपींविरुध्द खुनाच्या प्रयत्नासह दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे करीत आहेत.
(वार्ताहर)