खाद्यतेलाच्या दरवाढीचा भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:49 AM2021-01-13T04:49:44+5:302021-01-13T04:49:44+5:30
अहमदनगर : फोडणीशिवाय स्वयंपाक सुरू होत नाही, तर यासाठी आवश्यक असलेल्या तेलाच्या दरवाढीचा भडका उडाल्याने आधीच अडचणीत असलेल्या सामान्य ...
अहमदनगर : फोडणीशिवाय स्वयंपाक सुरू होत नाही, तर यासाठी आवश्यक असलेल्या तेलाच्या दरवाढीचा भडका उडाल्याने आधीच अडचणीत असलेल्या सामान्य माणसांचे जेवणही आता महागले आहे. गेल्या महिनाभरापासून तेलाच्या किमतीमध्ये २० ते ३० रुपयांनी वाढ झाली असून, सध्या तेलाचे भाव सव्वाशे ते दीडशे रुपये किलोपर्यंत गेले आहेत.
सध्या कोणतेही सणवार नाहीत. मात्र, परदेशातून खाद्यतेलाची आवक कमी झाल्याने ही दरवाढ झाली आहे. मलेशियामधून आयात होणाऱ्या तेलावरील आयात शुल्कात दुप्पट वाढ होऊन ते ३० टक्के झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात १०० रुपयांच्या आत आलेल्या सोयाबीन तेलाचे भाव दिवाळीच्या काळात ११० ते ११६ रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. सध्या हे भाव १३५ ते १४५ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. जेमिनी सोयाबीन १३० रुपये तर जेमिनी सूर्यफूल १३५ ते १४५ रुपये प्रतिकिलो असा किरकोळ दर आहे. निर्यात सुरू झाल्याने शेंगदाण्याचे भावही वाढले आहेत. सध्या शेंगदाणा ११० रुपयांवरून १२० रुपये प्रति किलोपर्यंत वाढला आहे, असे येथील किराणा मालाचे विक्रेते संजय साखरे यांनी सांगितले.
---
परदेशात कमी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन कमी झाले आहे, तर भारतात अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे. परिणामी आयात कमी झाली आहे. कामगारांच्या संपामुळे अर्जेंटिनामधील तेलाचा रिफायनरी प्रकल्प सध्या बंद आहे. देशातील तेलाचा साठा आता संपत आला आहे. तेल हे दैनंदिन जीवनात आवश्यक असल्याने त्याला कायम मागणी असते. त्यामुळे दरवाढ अटळ ठरली आहे.
- अर्जुन डोळसे, तेलाचे विक्रेते
-------
असे आहेत तेलाचे दर (प्रतिकिलो)
सोयाबीन - १३४ रुपये
करडी - १४५ रुपये
शेंगदाणा - १५० रुपये
सूर्यफूल - १५० रुपये
खोबरे - २८० रुपये
मोहरी - १८० रुपये
तीळ - १९० रुपये
सरकी - १३४ रुपये
------------------
डाळीचे भाव घसरले
डाळीचे दर मात्र किलोमागे १० रुपयांनी कमी झाले आहेत. हरभरा डाळ ८० वरून ६८ ते ७० रुपये किलोपर्यंत आली आहे. तूरदाळ १२० वरून ११० आणि आता १०० रुपये किलोपर्यंत कमी झाली आहे.
--
फाईल फोटो - गोडतेलाचा घ्यावा