अहमदनगर जिल्ह्यात रोहित पवारांचा उदय; भाजपचा गड ढासळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 02:04 PM2019-10-25T14:04:01+5:302019-10-25T14:04:44+5:30
शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तरुण चेहरा असलेले रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात ४३ हजार ३४७ मताधिक्य घेत पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव केला. या निकालाने २५ वर्षांपासून तग धरून असलेला भाजपाचा बालेकिल्ला ढासळला आहे़.
कर्जत-जामखेड मतदारसंघ/ अशोक निमोणकर /मच्छिंद्र अनारसे ।
शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तरुण चेहरा असलेले रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात ४३ हजार ३४७ मताधिक्य घेत पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव केला. या निकालाने २५ वर्षांपासून तग धरून असलेला भाजपाचा बालेकिल्ला ढासळला आहे़.
राम शिंदे यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात मतदारसंघात मोठा निधी आणला़. प्रत्यक्षात मात्र अपेक्षित कामे जनतेला दिसली नाहीत़. शिंदेंभोवती ठराविक कार्यकर्त्यांचा वाढलेला गोतावळा आणि त्यांचाच झालेला विकास यामुळे मतदारांमध्ये नाराजी वाढलेली होती़. दुसरीकडे रोहित पवार यांनी दीड ते दोन वर्षांपासून मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणीला प्रारंभ केला होता़. दुष्काळात पवार यांनी स्वखर्चाने मतदारसंघातील जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आणि तेव्हापासून रोहित पवार यांना जनतेची सहानुभूती मिळू लागली़. तसेच मतदारसंघात विविध आरोग्य शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम, युवा मतदारांच्या थेट संपर्कात राहणे आदी उपक्रम त्यांनी राबविले़. निवडणूकाळात बारामती मतदारसंघात झालेल्या सर्वांगीण विकासाचे चित्र जनतेला दाखविण्यात आले़. असाच विकास कर्जत जामखेडचा करायचा आहे हे पवारांचे आश्वासन येथील जनतेला चांगलेच भावले़.
रोहित यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही मतदारसंघातील महिला, किशोरवयीन मुली यांच्यासाठी विविध उपक्रम राबवून जनसंपर्क वाढविला़. या सर्व बाबींकडे सुरुवातीला राम शिंदे यांनी दुर्लक्ष केले. निवडणूक काळात मतदारसंघात शरद पवार यांच्या दोन सभा, अजित पवार यांच्या तीन सभा तसेच छगन भुजबळ, खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या सभांनी रोहित पवारांसाठी चांगले वातावरण तयार केले़. कर्जत येथील सांगता सभेत शरद पवार यांनी मी पंतप्रधान झालो नाही असे शल्य व्यक्त करत आता रोहित पवार यांच्या रुपाने जनतेला वारसा दिला. असे भावनिक आवाहन जनतेला केले होते़.
राम शिंदे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांचा सर्वसामान्य जनतेशी दुरावा वाढला़. मतदारसंघाचा ४० वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न शिंदे यांना पूर्णत: मार्गी लावता आला नाही़. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी सूत गिरणी व साखर कारखान्याचे उपस्थित केलेले मुद्दे जनतेला भावले नाहीत़. केलेली विकासकामेही जनतेपर्यंत पोहोचविता आली नाहीत़. तसेच भाजपा सरकारचे शेतकरीविरोधी धोरण, अनुदानापासून वंचित राहिलेले शेतकरी आदी कारणे राम शिंदेंच्या पराभवाला कारणीभूत ठरले़. प्रस्थापितांच्या धाटणीचे राजकारण शिंदे यांच्यासाठी अडचणीचे ठरले.