प्रत्येक सुखदु:खाच्या क्षणी साईदरबारी हजेरी लावणारे ऋषी कपूर; निधनानं शिर्डी हळहळली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 01:36 PM2020-04-30T13:36:04+5:302020-04-30T13:36:46+5:30

शिर्डी आणि कपूर घराण्याचे तीन पिढ्यांपासून कौटुंबिक संबंध

rishi kapoor used to visit shirdi on important moments of his life | प्रत्येक सुखदु:खाच्या क्षणी साईदरबारी हजेरी लावणारे ऋषी कपूर; निधनानं शिर्डी हळहळली

प्रत्येक सुखदु:खाच्या क्षणी साईदरबारी हजेरी लावणारे ऋषी कपूर; निधनानं शिर्डी हळहळली

- प्रमोद आहेर

शिर्डी: पृथ्वीराज कपूर यांच्यापासून कपूर कुटुंब साईबाबांशी जोडले गेले. त्यांच्यानंतर राज कपूर व त्यानंतर ऋषी कपूर यांनी ही भक्तीची परंपरा कायम ठेवली. प्रत्येक सुख-दु:खाच्या क्षणी कपूर कुटुंबाने साईबाबांना साकडे घातले आहे.

रणबीर कपूर व कतरीना कैफच्या संबंधामुळे नाराज असलेल्या ऋषी कपूर यांनी १७ डिसेंबर २०१५ रोजी साईदरबारी येऊन बाबांना साकडे घातले होते. साईबाबांनी ऋषी कपूर यांचे गाव्हाणे ऐकले आणि महिनाभरातच रणबीर कपूर व कॅतरीना कैफ वेगळे झाले. यामुळे आनंदीत झालेल्या ऋषी कपूर यांनी नितू कपूर यांच्यासह पुन्हा जानेवारी २०१६ मध्ये साई दरबारी हजेरी लावून बाबांना धन्यवाद दिले होते, अशी माहिती साईबाबा संस्थानचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी दिली. 

ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल बाजीराव शिंदे यांनी दु:ख व्यक्त केले. त्यांनी ऋषी कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला. ऋषी कपूर अगदी लहानपणापासून शिर्डीला येत असल्याने शिंदे यांनी ऋषी यांच्या लहानपणीच्या आठवणीही सांगितल्या. पूर्वी समाधी चौथऱ्यावर चढून पुजा करण्यात येत असे, आपल्याला ती संधी अनेकदा मिळाली होती, असेही ऋषी कपुर म्हणाले होते. संपर्कात आलेली माणसे जोडणे हा त्यांचा छंद होता. त्यामुळे ते अनेकदा फोन करून आपली चौकशीही करत असेही शिंदे यांनी सांगितले.

ऋषी कपूर यांची आठवण सांगताना माजी मंदिर प्रमुख प्रकाश खोत यांनी सांगितले की, १९७३ च्या सुमारास बॉबी चित्रपटाची इगतपुरीजवळ शुटींग सुरू होते. तेव्हा राज कपूर आणि ऋषी कपूर यांच्यासह संपूर्ण युनिट साईबाबांच्या दर्शनाला आले होते. यावेळी दिक्षीत वाड्यातील प्रसादालयात या सर्वांनी भोजन घेतले होते.

समाधी चौथऱ्यावरील मार्बलच्या जाळीला राज कपूर यांच्या देणगीतुन चांदीचे वेष्टन लावण्यात आले होते. त्यावेळी राज कपूर, कृष्णा कपूर व ऋषी कपूर यांच्यासह संपूर्ण कपूर कुटुंब उपस्थीत होते असेही खोत यांनी सांगितले. येथील मच्छिंद्र हिंगणे व या कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध होते. शिर्डी आणि कपूर घराण्याचे तीन पिढ्यांपासून कौटुंबिक संबंध आहेत. ऋषी कपूर यांनी हा ओलावा कायम ठेवला, आज त्यांच्या सारख्या साईभक्ताच्या जाण्याने शिर्डी हळहळली आहे.

Web Title: rishi kapoor used to visit shirdi on important moments of his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.