जिल्ह्यात पोलिसांची वाढती लाचखोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:26 AM2021-08-25T04:26:07+5:302021-08-25T04:26:07+5:30
श्रीरामपूर : नगर जिल्ह्यात या वर्षी अवघ्या सात महिन्यांमध्ये १२ पोलीस कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत. चक्क पोलीस ठाण्यांमध्ये ...
श्रीरामपूर : नगर जिल्ह्यात या वर्षी अवघ्या सात महिन्यांमध्ये १२ पोलीस कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत. चक्क पोलीस ठाण्यांमध्ये लाचखोरी करण्याची प्रवृत्ती बळावली आहे. अशा प्रकारांमुळे पोलीस दलाची डागाळलेली प्रतिमा पुसून टाकण्याचे मोठे आव्हान जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्यासमोर उभे राहिले आहे.
श्रीरामपूर पोलीस ठाण्यामध्ये चक्क पोलीस ठाण्यातच एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना संजय काळे या पोलीस हवालदाराला नाशिक येथील पथकाने रंगेहाथ पकडले होते. मात्र, चालू वर्षांतील ही पहिली कारवाई नाही. तत्पूर्वी तब्बल १२ पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले आहे. त्यामध्ये एका पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचाही समावेश आहे. त्याशिवाय पोलिसांचा एक खासगी हस्तकही या कारवाईत ताब्यात घेण्यात आला होता. लाचलुचपत विभागाने या दरम्यान नऊ ठिकाणी सापळा रचला होता. मागील वर्षीही पोलीस दलातील पाच कर्मचाऱ्यांवर यशस्वी सापळा लावण्यात आलेला होता.
नाशिक विभागातील लाचलुचपतच्या कारवायांमध्ये नगर जिल्हा अव्वल क्रमांक नोंदवत आहे. अशा प्रकारांमुळे जिल्ह्यातील पोलिसांचा गुन्हेगारीवरील वचक कमी झाला आहे. कारण या कारवायांमध्ये बहुतांशी वेळा गुन्हेगारांकडूनच लाच स्वीकारल्याच्या घटना अधिक आहेत. आरोपपत्रांमध्ये मदत करण्यासाठी किंवा गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी हे पैसे घेतल्याचे तपासात आढळले आहे. एक हजार रुपयांपासून ते काही लाख रुपयांमध्ये पैसे घेणाऱ्या काही कर्मचाऱ्यांची प्रकरणे या निमित्ताने समोर आली.
---------
साळवे यांच्या संपत्तीची चौकशी
मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस महासंचालकांकडून परवागी मिळाल्यानंतर, प्रसाद साळवे या पोलीस कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक संपत्तीची चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती उपअधीक्षक हरिश खेडकर यांनी दिली.
--------------
या कारवाईची तरतूद
लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक संपत्तीची चौकशी करणे, प्रथमदर्शनी गरजेचे वाटल्यास, त्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेतली जाते. त्यानंतर, पोलीस खात्यांतर्गत संबंधिताची विभागीय चौकशीही केली जाऊ शकते. लाचखोर कर्मचाऱ्याचे तत्काळ निलंबन केले जाते. त्यानंतर, त्याच्या सेवेवरही परिणाम होतो.
----------
ठाणे प्रमुख झटकतात जबाबदारी
लाचखोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यातील प्रमुखांना जबाबदार धरत, त्यांच्यावर बदलीची कार्यवाही करण्यात आली. अकोले व संगमनेर येथील लाचखोरीची प्रकरणे तेथील निरीक्षकांना भोवली होती. मात्र, तरीही तरीही श्रीरामपुरात लाचखोर पोलीस कर्मचारी मिळून आला. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
---------
कोणताही लोकसेवक कामासाठी पैसे मागत असेल, तर संपर्क साधावा. नाव गोपनीय ठेवले जाईल, तसेच तक्रारदाराचे कायदेशीर काम पूर्ण करून देण्याची आमची जबाबदारी राहील.
- हरिश खेडकर, उपअधीक्षक, एसीबी नगर.
-------