'स्वाईन फ्ल्यू'चा धोका वाढला
By Admin | Published: March 2, 2015 01:17 PM2015-03-02T13:17:08+5:302015-03-02T13:17:08+5:30
शहरासह जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी सुरू झालेली 'अवकाळी'ची संततधार दुसर्या दिवशी रविवारही कायम होती.
अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी सुरू झालेली 'अवकाळी'ची संततधार दुसर्या दिवशी रविवारही कायम होती. या पावसाने वातावरणातील गारवा चांगलाच वाढला असून, स्वाईन फ्लूचा प्रसार होण्यास पोषक वातारण तयार झाले आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर सोंगणीला आलेली गहू, हरभरा आणि ज्वारीची पिके भुईसपाट झाल्याने बळीराजाचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.
उन्हाची काहिली जावणत असतानाच अवकाळी पावसाने नगर शहर व परिसरासह जिल्ह्यात काल शनिवारी जोरदार हजेरी लावली. कडक उन्हाळा सुरू होण्याआधीच अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्ह्याला तडाखा दिला. पाऊस दुसर्या दिवशी रविवारीही सुरूच होता. दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा वाढला. दिवसभर सूर्यदर्शन झालेच नाही. सततच्या सरींनी वातावरणातील गारवा चांगलाच वाढला. या पावसाने महावितरणची यंत्रणाही कोलमडली. अचानक झालेल्या पावसाने गहू आणि हरभरा पिकांना सर्वाधिक तडाखा बसला. कांदाही शेतात भिजला. फळबागांची मोठय़ा प्रमाणात नासाडी झाली. त्यामुळे बळीराजाचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची चिन्हे आहेत. हाताशी आलेली पिके तर जाणारच आहेत, पण उलटपक्षी रोगराईदेखील वाढणार असून, स्वाईन फ्लू उग्र रुप धारण करण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली. वीज पुरवठा खंडित
अकोले : अकोले शहर व परिसरात अवकाळी पावसाने सुमारे २४ तास हजेरी लावल्याने ४३ मिमी पावसाची नोंद झाली असून यामुळे पिके व वीटभट्टीचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी सुरू झालेला पाऊस रविवारी सायंकाळपर्यंत सुरुच होता. यामुळे काढणीला आलेल्या गव्हाचे मोठे नुकसान झाले. इतर पिकांना मात्र थोडा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे वीज गायब झाली होती. कळस परिसरात मातीच्या विटा बनवणार्यांचे मोठे नुकसान झाले. सहा-सात हजार विटांची माती झाली, असे तान्हाजी झोगडे यांनी सांगितले. गहू व घास भुईसपाट झाल्याचे चित्र होते. रविवारी सायंकाळी पाच वाजता परिसरात शेतकर्यांना सूर्यदर्शन झाले. सकाळी सहा वाजेपर्यंत पावसाची झालेली नोंद मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे: अकोले- ४३, भंडारदरा-२४, निळवंडे- १६, पांजरे - २६, वाकी - ३0, कोतूळ- २४, आढळा देवठाण- ४. आश्वीला गहू पिकांचे नुकसान
आश्वी : शनिवारी सकाळी वातावरणात बदल होवून सायंकाळी ६ वाजल्यापासून आश्वी परिसरात २४ तासात आश्वी येथे २८ तर ओझर बंधारा येथे ३२ मिलीमीटर पाऊस पडला. अवकाळी पावसाने गहू, हरभरा, द्राक्ष व कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. तब्बल २0 तास वीज पुरवठा बंद होता. अशात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना धावपळ करावी लागली. रविवारी देखील पावसाचे सातत्य टिकून होते. पावसामुळे परिसरात अघोषित संचारबंदी जाणवत होती. ओझर, उंबरी बाळापूर, शेडगाव, शिबलापूर, आश्वी बु, आश्वी खु, प्रतापपूर, निमगाव जाळी आदी गावांमध्ये गहू, हरभरा, द्राक्ष, कांदा पिकांना पावसाचा चांगलाच फटका बसला. अवकाळी पावसाने पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. भंडारदर्याच्या पाणीसाठय़ात वाढ
राजूर : अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले असले तरी दुसरीकडे भंडारदरा धरणात या पावसामुळे बारा तासांत १0२ दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले आहे. धरणाच्या इतिहासात मार्चमध्ये नवीन पाणी येण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. दरम्यान, या पावसामुळे आढळा धरणातून सुरू असलेले आवर्तन बंद करण्यात आले. शनिवारी दुपारनंतर भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसास सुरूवात झाली. त्यामुळे बारा तासांत नवीन १0२ दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले. परिणामी धरणातील पाणीसाठा आता ५ हजार ७८६ दलघफू झाला. दरम्यान परिसरात सर्वदूर पाऊस होत असल्याने आढळा धरणातून सुरू असलेले आवर्तन रविवारी सकाळी बंद करण्यात आले, तर सांगवी धरणातून सोडण्यात येणारे आवर्तन पुढे ढकलण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता किरण देशमुख यांनी दिली.
■ शहरासह जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे महावितरणची यंत्रणा कोलमडली. शनिवारी रात्री व रविवारी दिवसभर शहरात वीजेचा लपंडाव सुरू होता. पावसामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या कोसळल्या. त्यामुळे वीजपुरवठय़ात व्यत्यय आला. महावितरणने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी, सावेडीसह इतर भागात वीजपुरवठा विस्कळीत होता. हाताशी आलेल्या पिकांवर पाणी
■ शेतातील उभी पिके वादळी वार्यासह झालेल्या पावसाने भुईसपाट झाली. गहू, हरभरा आणि ज्वारीच्या हाताशी आलेल्या पिकांवर पाणी फिरले. जिल्ह्यात डाळींब, द्राक्षे, पपई यांसारख्या फळपिकांवर परिणाम झाला आहे. कडक उन्हामुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झाला होता. मात्र पावसामुळे गारवा वाढल्याने स्वाईन फ्लूचा पसार होण्यास पोषक वातावरण तयार झाले असून, काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांची खबरदारीचे उपाय करावेत.- एस. एम. सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक