विदेशात शिकलो तरी शेतीशी नाळ कायम-ऋतुराज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 01:43 PM2020-01-17T13:43:10+5:302020-01-17T13:44:14+5:30
विदेशात शिकलो असलो तरी मुळात आम्ही शेतकरी आहोत. त्यामुळे आमची शेतीशी नाळ कायम आहे. घरात मोठी राजकीय, सामाजिक परंपरा आहे. काम करताना याबाबींचे थोडे दडपण असते. मात्र गेल्या दहा वर्षापासून समाजात काम करत असल्याने आता दडपण वाटत नाही, असे विचार कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केले.
संगमनेर : विदेशात शिकलो असलो तरी मुळात आम्ही शेतकरी आहोत. त्यामुळे आमची शेतीशी नाळ कायम आहे. घरात मोठी राजकीय, सामाजिक परंपरा आहे. काम करताना याबाबींचे थोडे दडपण असते. मात्र गेल्या दहा वर्षापासून समाजात काम करत असल्याने आता दडपण वाटत नाही, असे विचार कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केले.
संगमनेर येथील अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या मेधा २०२० युवा संस्कृतीत महोत्सवात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात प्रसिध्द गायक अवधूत गुप्ते यांनी घेतलेल्या मुलाखतीत आमदार पाटील बोलत होते.
घरातील मोठ्यांचा वारसा सांभाळताना दडपण येते का? याबाबत पाटील म्हणाले, अगदी लहापणापासून डी.वाय.पाटील, सतेज पाटील यांचा संघर्ष जवळून पाहिला आहे. त्यांचे राजकीय, सामाजिक जीवन, त्यांची काम करण्याची पद्धत समजून घेतली. आता नवी पिढी म्हणून ही परंपरा सांभाळताना थोडे दडपण असते. समाजात काम करत असताना मागच्या पिढीची आणि नव्या पिढीच्या कामाची तुलना होते. त्यामुळे चांगले काम करावे लागते. कष्ट करावे लागतात. मी कायम कार्यकर्ता म्हणूनच काम करत आहे आणि करत राहणार, असे पाटील यांनी सांगितले.
विदेशात शिक्षण घेतले तेथील वातावरण पाहून तेथेच रहावे वाटले नाही का? या प्रश्नावर पाटील म्हणाले, अमेरिकेत शिक्षण झाले. मात्र आमच्या कुटुंबाची परंपरा समाजसेवेची आहे. त्यामुळे आम्ही विदेशात राहणे शक्यच नाही. आपल्या मातृभूमीत काही तरी केले पाहिजे याची ओढ होतीच. आपले राज्य कसे पुढे गेले पाहिजे हाच मनात ठेऊन येथे आलो. त्यातूनतच सध्या समाजात काम करीत आहे, असेही पाटील म्हणाले.