नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेरात रास्ता रोको
By शेखर पानसरे | Published: September 2, 2023 01:01 PM2023-09-02T13:01:50+5:302023-09-02T13:02:15+5:30
जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकरवी झालेल्या लाठीचार्जचा निषेध
- शेखर पानसरे
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर : जालना जिल्ह्यातील अंतरावाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत असताना शनिवारी (दि.०२) संगमनेर शहरातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गावर सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जविरोधात यावेळी संताप व्यक्त करण्यात आला. ‘मराठा बांधवांवर झालेल्या लाठीचार्जचा जाहीर निषेध’, ‘एक मराठा लाख मराठा’ असे फलकही आंदोलनकर्त्यांनी झळकवले. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे आंदोलनात सहभागी झाले होते. तसेच विविध राजकीय पक्ष, संघटना यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला, त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे देखील आंदोलनात सहभागी झाले होते. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जालना जिल्ह्यातील अंतरावाली सराटी गावात शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर बेसुमार लाठीचार्ज झाला, त्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला. लाठीचार्जचे आदेश देणाऱ्यांवर कारवाई करावी. आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.