नेवाशात मोकाट जनावरांचा रास्तारोको; नगरपंचायतीचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 06:25 PM2017-11-20T18:25:17+5:302017-11-20T18:28:10+5:30

नेवासा शहरात दररोज ठिकठिकाणी मोकाट जनावरांचा रास्ता रोको होत असून अनेकदा वाहतूक विस्कळीत होत आहे. मात्र याकडे नगरपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

The road stop due to wild animals; Neglect of Municipal Panchayat | नेवाशात मोकाट जनावरांचा रास्तारोको; नगरपंचायतीचे दुर्लक्ष

नेवाशात मोकाट जनावरांचा रास्तारोको; नगरपंचायतीचे दुर्लक्ष

नेवासा : नेवासा शहरात दररोज ठिकठिकाणी मोकाट जनावरांचा रास्ता रोको होत असून अनेकदा वाहतूक विस्कळीत होत आहे. मात्र याकडे नगरपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
नगरपंचायत रस्ता, औदुंबर चौक, संभाजी चौक, बाजारतळासह मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा संचार दिवसभर असल्याने सर्वांनाच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायत काळात मोकाट जनावरांसाठी असलेला कोंडवडा बंद झाला आहे. नगरपंचायत कार्यालयासमोर असलेल्या भाजी मंडईमध्ये भाजी विक्रेत्यांना मोकाट जनावरांचा वावर असतो. याचा त्रास भाजी विक्रेत्यांना तसेच ग्राहकांना सुद्धा होतो. जनावरे हाकलले तरी हालत नाहीत. पिशवीतील भाजी ओढणे, धक्के देणे यामुळे भाजी मंडईमध्ये व रविवारच्या बाजारात ग्राहक किरकोळ जखमी होत आहे. काही महिन्यांपूर्वी शहरातील एका व्यक्तीला देखील या मोकाट जनावरांमुळे आपले प्राण गमवावे लागले आहे.
ज्ञानेश्वर मंदिर मार्ग तसेच शेवगाव-श्रीरामपूर रस्ता, बसस्थानक, गणपती मंदिर, नाथबाबा चौक याठिकाणी मोकाट जनावरे रस्त्यात बसून राहिल्यामुळे राजमार्गावर जनावरांच्या रास्तारोकोमुळे दररोज ट्राफिक जाम होत असतो. सध्या वाळू उपसा बंद असल्याने वाळू वाहतूक करणारे गाढवे नेवासा शहरात गल्लीबोळीत फिरत असतात. तर मोकाट गायींची संख्या जास्त झाली आहे. शहरामध्ये दर तीन चार महिन्यांनी अज्ञात टेम्पोद्वारे कुत्रे आणून सोडले जातात. पण यावर कोणत्याही खात्याचे लक्ष नाही. तसेच श्वान निर्बिजीकरणाची कोणतीही मोहीम ग्रामपंचायतीने देखील राबवलेली नाही आणि आता नगरपंचायतही राबवत नाही.
ज्ञानोदय इंग्लिश स्कूल, जिल्हा परिषद मुलांची शाळा, मुलींची पाकशाळा, गावातील ग्रामदैवत मोहिनीराज मंदिरासमोर मोकाट जनावरे बसून राहतात. अथवा त्यांच्या लढतीमध्ये शालेय विद्यार्थ्यांना शाळेत सुद्धा जाता येत नाही. नेवासा नगरपंचायतीने पाच महिन्यात ३-४ वेळा मोकाट जनावरांच्या मालकांना सूचना देण्यासाठी रिक्षा फिरविली व वृत्तपत्रात जाहिरातही दिलेली आहे. मात्र अद्याप यावर कुठलीही कार्यवाही नगरपंचायत प्रशासनाने केलेली दिसत नाही. जनावरांचा कोंडवाडा नसल्याने मोठी अडचण होत आहे.

Web Title: The road stop due to wild animals; Neglect of Municipal Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.